Famous Director Death Due To Heart Attack: अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या 'धूम' चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या भन्नाट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचं निधन झालं आहे. रविवारी सकाळी संजय यांनी मुंबईमध्ये शेवटचा श्वास घेतला. संजय हे 57 वर्षांचे होते. संजय यांनी 'धूम' तसेच या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'धूम-2'चंही दिग्दर्शन केलं होतं. 'धूम-2'मध्ये प्रमुख भूमिका ऋतिक रोशनने साकारली होती.


छोट्या चित्रपटातून केलं पदार्पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय यांनी 2004 साली ज्या पद्धतीने 'धूम' सारख्या सुपरबाईक्सवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं ते पाहून आजही चाहते त्यांचं कौतुक करतात. संजय यांचं निधन हार्ट अटॅकमुळे झालं. संजय यांनी दिग्दर्शक म्हणून 2000 साली एका छोट्याश्या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं नाव 'तेरे लिए' असं होतं. या चित्रपटाला फारसा उत्तम प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट तिकीटबारीवरही आपटला होता. मात्र संजय यांनी जिद्द सोडली नाही.


'धूम'मधून मिळाली ओळख


संजय यांचा दुसरा चित्रपट 'मेरे यार की शादी है' हा होता. हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला. उदय चोप्रा, जिमि शेरगिल आणि ट्यूलिप जोशी यांच्या या चित्रपटामधून संजय यांना पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर यश मिळालं. त्यानंतर 2004 साली 'धूम' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधून संजय यांना खऱ्या अर्थाने जगभरामध्ये ओळख मिळाली. 'धूम' हा चित्रपट 2004 मधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटामधील गाणी आजही ऐकली जातात.


'धूम-2'ही गाजला


'धूम-2'लाही प्रचंड यश मिळालं. याचं दिग्दर्शनही संजय गढवी यांनीच केलं होतं. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका ऋतिक रोशनने साकारली होती. पहिल्या चित्रपटामधून रेसिंग बाईक्स आणि जॉन अब्राहमची स्टाइल लक्षात राहिली तर 'धूम-2'मधील चोरीची भन्नाट स्टाइल आणि ऋतिक रोशनने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 


नंतर नशिबी अपयश


'धूम' फ्रेंचायझीनंतर संजय यांनी इम्रान खान, संजय दत्त आणि मनिषा लांबा यांच्या 'किडनॅप' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट तिकीटबारीवर फारसा चालला नाही. यानंतर संजय यांनी जॅकी भगनानी, अर्जुन रामपाल यांच्या अभिनयाने नटलेला, 'अजब गजब लव' हा 2012 साली प्रदर्शित झालेला चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र हा चित्रपटही पडला.


शेवटचा चित्रपट कोणता?


2020 साली ओटीटीवर प्रदर्शित झालेला 'ऑपरेशन परिंदे' हा संजय गढवी यांचा शेवटचा चित्रपट ठरला. अमित साधची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये संजय गढवी यांनी मला 'धूम'च्या साच्यातून बाहेर पडून प्रत्येक पद्धतीचा चित्रपट करायचा आहे, असं म्हटलं होतं. मात्र काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला.


चांगला दिग्दर्शक गमावला


मात्र 'धूम'च्या दिग्दर्शकाच्या जाण्याने काळाच्या एक पाऊल पुढं असलेला दिग्दर्शक गमावल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.