चिरंजीवीसाठी काहीपण... चाहत्यांनी अभिनेत्यासाठी असंकाही केलं की...
ऐसी दिवानगी.....
मुंबई : आपल्या आव़डीच्या कलाकारापोटी किंवा त्याच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी चाहते असंकाही करतात की त्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. सध्या अशीच चर्चा होत आहे ती म्हणजे अभिनेता चिरंजिवी यांच्या काही चाहत्यांची. निमित्त ठरत आहे ते म्हणजे त्यांचा चित्रपट 'से रा नरसिंहा रेड्डी'.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे चिरंजीवी यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा पुन्हा एकदा अंदाज लागत आहे. चित्रपटाच्या रुपाने एक अभिनेता म्हणून त्यांनी प्रेक्षकांना खास भेट दिलेली असतानाच चाहत्यांनीही या एव्हरग्रीन अभिनेत्य़ासाठी असंकाही केलं आहे, जे पाहता खुद्द चिरंजीवी यांनाही आनंद झाला असेल.
एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हैदराबाद येथे चाहत्यांनी शहराच्या केंद्रस्थानीच त्यांचं एक भव्य कटाऊट उभं केलं. चित्रपटातील त्यांच्या नरसिंहा रेड्डी लूकमध्येच हे कटआऊट तयार करण्यात आलं आहे. ज्यावर मोठमोठे हार लावण्यात आले आहेत.
कलाकारांप्रती असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी दाक्षिणात्य चाहते अनेकदा चर्चेत असतात. त्याचंच एक उदाहरण यावेळीही पाहायला मिळालं हेच चिरंजीवींच्या या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा झळकत आहेत. त्यामुळे दोन मोठ्या कलाकारांचा अभिनय पाहण्याची चाहत्यांनी मिळालेली ही सुवर्णसंधी आहे, असं म्हणायला हरकत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसंगांवर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सुरेंद्र रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती राम चरणने केली आहे. यामध्ये चिरंजीवी हे मुख्य भूमिकेत झळकत आहेत.