मुंबई : दर सोमवारी आणि मंगळवारी छोट्या पडद्यावर साडे नऊ वाजता ''कसे आहेत सगळे, हसताय ना... हसायलाच पाहिजे...'' असं म्हणत घराघरांत आपलं स्थान मिळवणारा आपला लाडका होस्ट म्हणजेच डॉ. निलेश साबळे. पुण्यातील सासवडमध्ये राहणारा निलेश अभ्यासाबरोबरच स्वतःतील कलागुणांना खतपाणी घालतो. झी मराठी वाहिनीवरील अभिनयाची स्पर्धा ते पुढे फू-बाई-फूचा निवेदक म्हणून त्याने सगळ्यांचाच मनात घर निर्माण केलं. त्यानंतर 'चला हवा येऊ द्या' म्हणत त्याची गाडी सुसाट सुटली. पण वरवर जरी हे सगळं सहज-सोपं वाटंत असलं तरी अडथळ्यांवर मात करत स्वप्नपूर्तीसाठी झगडून निलेशने आज यशोशिखर गाठला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेक्षक म्हणतायेत 'चला ऑक्सिजन येवू द्या'
प्रेक्षकांच्या लाडक्या निलेशने नुकताच 35वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमीत्ताने अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.निलेश साबळे अभिनेता होण्याआधी एक डॉक्टर आहे. आज 1 जुलै म्हणजेच डॉक्टर दिन. योगायोग म्हणजे निलेशचा वाढदिवस 30 जून आणि आणि आज डॉक्टर दिन. त्यामुळे असं म्हणायला काहीच हरकत नाही की, हा एक त्याच्या आयुष्याशी निगडित असलेला योगायोग. गंमतीशीर बाब म्हणजे त्याचे चाहते त्याला 'चला ऑक्सिजन येवू द्या' म्हणत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेतच. त्याचबरोबर त्याला डॉक्टर दिनाच्या देखील शुभेच्छा देत आहेत


डॉक्टर होण्यामागची इंट्रेस्टिंग कहाणी
महाराष्ट्राचा लाडका डॉक्टर-अभिनेता निलेशला लहानपणापासून अभिनयाची आवड असूनदेखील त्याला डॉक्टर का व्हावं लागलं, यामागे एक इंट्रेस्टिंग कहाणी आहे. कोल्हापूरमधून स्वप्न घेवून मुंबईत आलेल्या निलेशच्या कारकिर्दीत बरेच चढउतार आले. आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर कोल्हापूरजवळच्या एका गावातून निलेश एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी थेट मुंबईला आला. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून नावारुपास आल्यावर त्याने 'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. 


एका मुलाखती दरम्यान त्यानं सांगितलं होतं की, ''वैद्यकीय पदवी मिळवल्याबद्दल माझे आई-वडील खूप खूश होते. यानंतर मी वाशीमधल्या एमजीएम न्यू बॉम्बे रुग्णालयात सहा महिने कामसुद्धा केलं होतं. तेव्हा 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'बद्दल मी ऐकलं आणि या कार्यक्रमाचं ऑडिशन देण्यासाठी आईवडिलांची परवानगी घेतली. 


यासाठी आईवडिलांनी परवानगी तर दिली पण जर पुढच्या दोन वर्षांत काहीच होऊ शकलं नाही तर पुन्हा वैद्यकीय क्षेत्रात परतायचं, असं त्यांनी ठामपणे बजावलं होतं. "नशिबाने मी अभिनय क्षेत्रात यशस्वी झालो आणि आता जे करतोय त्यात खूप खूश आहे", असं तो पुढे म्हणाला. निलेश साबळेची पत्नीसुद्धा डॉक्टर आहे. डॉक्टर निलेश साबळे आणि गौरी साबळेला झी 24तासकडून डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा.