`राजेश खन्ना फार गर्विष्ठ होते, मला फार किळस वाटायची जेव्हा...`, फरीदा जलाल यांनी पहिल्यांदाच केला खुलासा
बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच `आराधना` (Aradhana) चित्रपटाच्या यशानंतर कशाप्रकारे राजेश खन्ना यांचा अंहकार वाढला होता हेदेखील सांगितला.
बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी आपल्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसह काम केलं आहे. 1996 मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासह 'आराधना' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना यांच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटानंतर राजेश खन्ना रातोरात सुपरस्टार झाले आणि त्यांचे चाहते खासकरुन महिला चाहते प्रचंड वाढले. पण फरीदा जलाल यांना मात्र राजेश खन्ना यांच्यासोबत काम करताना वेगळाच अनुभव आला होता.
Bollywood Bubble ला दिलेल्या मुलाखतीत फरीदा जलाल यांनी राजेश खन्ना यांच्यासह काम करण्याचा अनुभव सुखद होता असं सांगितलं आहे. तसंच आराधना चित्रपटाच्या यशानंतर कशाप्रकारे राजेश खन्ना यांच्यात अहंकार आला आणि तरुणी त्यांच्यामागे वेड्या झाल्या हा अनुभव सांगितला. आपले अनेकदा त्यांच्याशी वाद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
राजेश खन्ना यांच्यासह काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, "आराधनाच्या यशानंतर जतीनचे राजेश खन्ना झाले. तोपर्यंत त्यांच्यात थोडा अहंकारही आला होता. आराधनानंतर त्यात वाढच झाली होती. त्यात ते चित्रपटात डबल रोलमध्ये होते. पण तो चांगला चित्रपट होता. मी आजही कधीकधी तो चित्रपट पाहते. त्या चित्रपटात त्यांनी चांगलं काम केलं होतं. मी त्यावेळी शर्मिला टागोर यांना रिंकूजी म्हणायचे. त्या माझ्या बाजूने बोलत माझं रक्षण करायच्या".
राजेश खन्ना यांच्या स्टारडमवर त्या म्हणाल्या की, “खरं सांगायचं तर मी त्यांना कधीच इतकं महत्त्व देत नसे आणि त्यामुळे ते थोडे नाराज व्हायचे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आठवडाभर चालला. नंतर 25 आठवडे, 50 आठवडे आणि 75 आठवडे पूर्ण करत हिरक महोत्सवी झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने याला हिट चित्रपट म्हटलं गेलं. प्रचंड यशामुळे लोक वेगवेगळ्या शहरांत बोलावून ज्युबिली अवॉर्ड देत असत. या दौऱ्यांदरम्यान राजेश खन्ना यांच्याशी समीकरण वाढलं".
पुढे त्यांनी सांगितलं की, "त्यावेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमच्यात मैत्री झाली. शूटिंगवेळी ते फार गर्विष्ठपणे वागायचे. एकदा मी त्यांना आपण रिहर्सल केली तर बरं होईल असं म्हटलं होतं. त्यावर ते ओरडून किता वेळा करणार असं म्हणाले होते. मी तेव्हा नवी असल्याने मला फार वाईट वाटलं होतं. मी त्यांना तुम्ही असं कसं बोलू शकता, मी 10 वेळा रिहर्सल मागेन असं म्हटलं होतं. तेव्हा फार भांडणं व्हायची आणि शर्मिलाजी माझं रक्षण करायच्या. त्या नेहमी माझ्या बाजूने बोलत असत. अवॉर्ड सोहळ्यादरम्यान आम्ही चांगले मित्र झालो".
राजेश खन्ना यांच्या तरुणी चाहत्यांना पाहून आपल्याला फार वीट यायचा असंही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, "मी मुलींना पाहायचे, त्या सगळ्या त्यांच्या मागे वेड्या झालेल्या असत. तरुणी खाली येऊन पडत असत आणि मला फार किळस यायची. कोणी म्हणायचं इथे सही द्या. कोणी म्हणायचं तिथे सही द्या. मला फार किळसवाणं वाटायचं. तर ते मला म्हणायचे 'पाहिलं का, स्टार'. मी विचार करायचे यांना काय झालं आहे. मी तर चित्रपट केला, गाणीही गायली. पण हे बोलावं लागेल की, जो स्टारडम, वेडेपणा मी त्यांच्यासाठी पाहिला तो इतर कोणत्याही हिरोसाठी पाहिला नाही".