Brief For Actress Dressing: मनोरंजन सृष्टीमधील अनेक किस्से कायमच चर्चेत असतात. खरं तर जेवढं पडद्यावर दिसतं त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी पडद्यामागे घडत असतात. मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या चित्रपटासाठी पडद्यामागे अनेक व्यक्ती झटत असतात. अर्थात यामध्ये केवळ सेटवरील व्यक्तींचा समावेश असतो असं नाही. यामध्ये फॅशन डिझायनर, संगीतकार, गीतकार यासारख्या लोकांची मोलाची भूमिका असते. या लोकांकडेही चित्रपटासंदर्भात वेगवेगळे किस्से असतात. असाच एक किस्सा प्रसिद्ध दिग्दर्शक मनिष मल्होत्राने सांगितला आहे. एका युट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने पूर्वीच्या काळी कलाकारांच्या कपड्यांसंदर्भात कशापद्धतीने ब्रीफ दिलं जायचं याबद्दलची माहिती दिली.


अनेकदा ऐकलं असेल हे नाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर मनिष मल्होत्रा हे नाव आपल्यापैकी अनेकांनी फॅशन शोसंदर्भातून ऐकलं असेल. तसेच कलाकारांच्या लग्नाच्या वेळेस नववधूचा लेहंगा किंवा महागडे कपडे डिझाइन करणारा डिझायनर म्हणून सर्वसामान्यांनी बातम्यांच्या माध्यमातून मनिष मल्होत्रा हे नाव ऐकलं असणार. मात्र खरं सांगायचं झालं तर मागील अनेक दशकांपासून मनिष मल्होत्रा मनोरंजनसृष्टीमध्ये फॅशन डिझायनर म्हणून काम करतोय. हल्ली सोशल मीडिया आणि इतर प्रसारमाध्यमांचा आवाका आणि मनोरंजनसृष्टीचा चित्रपटांबद्दलचा दृष्टीकोन बदलल्याने मनिषसारखे हरहुन्नरी लोक अधिक प्रकाशझोतात येऊ लागले आहेत असं म्हणता येईल. मनिष हा स्वत: सोशल मीडियावर भरपूर सक्रीय आहे. नुकतीच त्याने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. 'वी आर युवा' नावाच्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये, मनिषने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे काही किस्से सांगितले. 


अभिनेते कपड्यांचा फारसा विचार करायचे नाहीत


मनिषने 1990 च्या दशकामध्ये चित्रपटांसाठीचं फॅशन डिझायनिंग कसं होतं याबद्दलची आपली निरिक्षणं आणि अनुभव सांगितले. "त्या काळात अभिनेत्री त्यांना स्क्रीनवर कोणते कपडे परिधान करायचे आहेत याबद्दल जागृक होत्या," असं मनिष म्हणाला. मात्र त्याचवेळी पुरुषांबद्दल म्हणजेच अभिनेत्यांबद्दल हीच स्थिती अगदी विरुद्ध होती असंही मनिषने सांगितलं. "पुरुष म्हणजेच अभिनेते स्क्रीनवर काय परिधान करायचं आहे याबद्दल फारसा विचार करायचे नाहीत," असं मनिष मल्होत्रा म्हणाला. 


नक्की पाहा फोटो >> 'अक्षय कुमारला छातीवरचे केस ट्रीम करण्यास सांगितले तेव्हा..'; Switzerland मधील प्रकार


मोजक्या शब्दात सांगायचे अपेक्षा


कलाकारांचे कपडे कसे असावेत याबद्दल आता निर्माते, दिग्दर्शक, कथाकार अधिक जागृत असतात. मात्र पूर्वी असं नव्हतं. अगदी मोजक्या शब्दांमध्ये दिग्दर्शकांकडून स्क्रीनवर कलाकार कसे दिसले पाहिजेत हे सांगितलं जायचं. मात्र सविस्तर तपशील मिळेलच याची शश्वती नसायची. असाच एक प्रकार मनिषबरोबरही घडला होता. तो त्याने या मुलाखतीत सांगितला.


तो किस्सा ऐकून मुलाखतकारालाही हसू अनावर


"सेक्सी वाटली पाहिजे," अशा मोजक्या शब्दांमध्ये मला अभिनेत्री कशी दिली पाहिजे याचा ब्रिफ दिला जायचा असं मनिष म्हणाला. अनेकदा हा ब्रिफ आणि त्यामगील मागण्या विचित्र असायच्या असा मनिषच्या सांगण्याचा एकंदरित कल होता. अशाच एका मागणीबद्दलची आठवण त्याने सांगितली. "मला आठवतंय की, ती (अभिनेत्री) अंत्यसंस्काराला चाललीये, मात्र ती सेक्सी दिसली पाहिजे असं मला एकदा सांगण्यात आलं होतं. मी बराच वेळ विचार करत होतो की नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं," असं मनिष मल्होत्रा आठवण सांगताना म्हणाला. हे ऐकून मुलाखतकारालही हसू अनावर झालं.