आधी कर्करोग, नंतर ब्रेन ट्युमरचंही निदान, फेमिना मिस इंडियाची मृत्यूशी झुंज अपयशी
ती 28 वर्षांची होती. गेल्या दोन वर्षांपासून रिंकी ही कर्करोगाशी झुंज देत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
Rinky Chakma Death : फेमिना मिस इंडिया त्रिपुरा हा किताब पटकावणारी मॉडेल रिंकी चकमा हिचे निधन झालं आहे. ती 28 वर्षांची होती. रिंकीने 28 फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून रिंकी ही कर्करोगाशी झुंज देत होती. पण तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. रिंकीच्या निधनानंतर अनेक चाहत्यांना आणि सहकलाकारांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिंकीला दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु होते. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण कर्करोग तिच्या फुफ्फुसात आणि नंतर त्याच्या डोक्यात पसरला आणि त्यामुळे तिला ब्रेन ट्युमरचंही निदान झालं. यात तिची प्रकृती दिवसेंदिवस खालवत गेली. तिला 22 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिची प्रकृती खूपच गंभीर होती. तिच्या फुफ्फुसांनी काम करणे बंद केले होते. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर बुधवारी 28 फेब्रुवारीला तिची प्राणज्योत मालवली.
रिंकी शर्माची शेवटची पोस्ट
रिंकीने गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. यात तिने तिच्या चाहत्यांना तब्येतीची माहिली दिली होती. मला सर्वांना कळवायचे आहे की, मी आणि माझे कुटुंब कठीण काळातून जात आहोत. गेली 2 वर्षे नियमित रुग्णालयात राहणे आमच्यासाठी अजिबात सोपं नाही. मी लोकांकडून देणगींचा स्वीकार करत आहे. कारण आता आमची सर्व बचत संपली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी यावर उपचार घेत आहे, असे रिंकीने म्हटले होते.
आर्थिक मदतीचे केलेले आवाहन
तर रिंकीची मैत्रीण प्रियांका कुमारी हिने काही दिवसांपूर्वी रिंकीला पैशांची गरज असून तिच्यासाठी पैसे दान करा, असे आवाहन सोशल मीडियाद्वारे केले होते. आम्ही आमची मैत्रीण रिंकी चकमा हिच्यासाठी फंड गोळा करतोय. तिच्यावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज आहे, कृपया मदत करा, असे आवाहन प्रियांकाने केले आहे.
दरम्यान रिंकी चकमाने 2017 मध्ये मिस इंडिया (त्रिपुरा) चा किताब पटकावला होता. त्यासोबतच रिंकीला मिस ब्यूटी विद अ पर्पस या खास पुरस्कारनेही गौरवण्यात आले होते. मिस इंडिया ऑर्गेनाइजेशननं रिंकीच्या निधनाची पोस्ट शेअर करताच तिच्या फॉलोअर्संना मोठा धक्का बसला.