चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना अटकेपासून दिलासा नाही
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता मोठ्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकले आहेत
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता मोठ्या कायदेशीर कारवाईमध्ये अडकले आहेत. 'नाय वरन भात लोंच्या, कोन नाय कोन्चा' या चित्रपटामध्ये लहान मुलांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केल्यामुळं त्यांच्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयानं पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. आता समोर आलेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकरांना अटकेपासून संरक्षण देण्यास हायकोर्टांने नकार दिला आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगानं देखील याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात आता मांजरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्कोच्या सेक्शन 292, 34 तसंच आयटी सेक्शन 67 आणि 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिम पोलिसांनी मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यात लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण, अश्लील प्रसंग, अल्पवयीन मुलांचे नकारात्मक चित्रीकरण असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मांजरेकर यांच्याविरोधात भारतीय दंडसंविधानाच्या कलम 292, 34, पोक्सो कायद्यातील सेक्शन 14 आणि आयटी कायद्याअंतर्गत सेक्शन 67 आणि 67 बी अन्वये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणात मांजरेकरांना अटक होणार यात काही शंका नाही.