वसईमध्ये मंगळवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. भरदिवसा रस्त्यात प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंड पाना वापरुन हल्ला करुन निर्घृण हत्या केली. या प्रकरणामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न, पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकाणातील आरोपी रोहित याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेच्या सिनेविश्वातूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी मनोरंजन विश्वातील दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला आहे. समीर यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत लिहिलं की, 'वसईतील एका तथाकथित प्रियकराने दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष निर्घृण हत्या केली. हे असं देशात वारंवार होत असतं. मुर्दाड बघ्यांचं काय करायचं हे प्रश्न आहेतच. पण आता असं वाटत नाही का की शाळांमधून (मराठी, इंग्रजी, महानगरपालिका, खासगी किंवा इतर..) सर्व ठिकाणी मानसशास्त्र हा विषय असायला हवा? मानसोपचार तज्ज्ञ/समुपदेशक बोलावून लहानपणापासून गोष्टी शिकवायला हव्यात! पालकांचीही वेळोवेळी सेशन्स व्हायला हवेत! मला तरी असं वाटतं, की याचा गांभीर्याने विचार करायला हवा. प्रयत्न तरी नक्कीच व्हायला हवेत,” अशी भावना समीर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.



वसईतील हत्येच्या घटनेने मुंबईसह अवघा महाराष्ट्र हादरुन गेला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे समाजातील स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिवसाढवळ्या भररस्त्यात वाढणाऱ्या या घटनांमुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला की नाही? अशी मतं सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. आरोपी रोहित यादव आणि त्याची प्रेयसी आरती यादव हे काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. बऱ्याच दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं होत होती. मंगळवारी सकाळी आरती कामावर जात असताना रोहितने तिला अडवलं, तेव्हा दोघांमध्ये शाब्दिक खटके उडायला लागले. त्यावेळी रागाच्या भरात रोहितने आरतीवर पान्याने वार केला आहे. हा सगळा प्रकार घडत असताना जमावाने बघ्याची भूमिका घेतली.  या सगळ्या प्रकरणामुळे मुंबईसह उपनगरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.