जम्मू- काश्मीरमधील अभिनेत्रीशी संपर्क होत नसल्यामुळे दिग्दर्शिका चिंतातूर
हा माझा भारत देश नाही....
मुंबई : आपल्या धर्माच्या अनुशंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या काही गोष्टी प्रकर्षाने पुढे करत एका अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी कलाविश्वातून काढता पाय घेतला. 'परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान, याच्या 'दंगल' या चित्रपटातून तिने अभिनयाची सुरुवात केली. मुख्य म्हणजे पहिल्या चित्रपटात तिने अभिनयाचा दमदार नमुना सादर केला. ही अभिनेत्री म्हणजे झायरा वसिम.
'दंगल गर्ल' म्हणून फार कमी वेळातच नावारुपास आलेल्या झायराची चित्रपट विश्वातील एक्झिट ही अनेकांना धक्का देणारी ठरली. सध्याच्या घडीला तिच्याविषयी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाची दिग्दर्शिका, शोनाली बोस हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अत्यंत गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे.
जम्मू- काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी आपले विचार मांडत काश्मीर खोऱ्याच अनेक वर्षांपासून मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचं आपण पाहिलं आहे, ही बाब तिने स्पष्ट केली. यामध्ये तिने काँग्रेस सरकारच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. झायरासोबतचा एक फोटो पोस्ट करत तिने या फोटोसह लिहिलेल्या कॅप्शनमध्ये आपल्या मुलीप्रमाणे असणाऱ्या झायराशी कित्येक दिवस संपर्क न झाल्याविषयीची चिंता व्यक्त केली.
जम्मू- काश्मीर परिसरात तैनात असणारं सैन्य पाहून काहीतरी मोठं होणार असल्याची भावना झायराच्या मनात घर करुन होती, असं लिहित शोनालीने आपण या क्षणाला झायराला, तिच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही; किंबहुना तिच्याशी आपला कोणताच संपर्कही होत नसल्याची खंत व्यक्त केली. #NotmyIndia असा हॅशटॅग जोडत शोनालीने तिचा संतापही व्यक्त केला.