मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा अर्थात ईओडब्ल्यूने यशराज फिल्म्स या कंपनीविरोधात आणि त्याअंतर्गत येणाऱ्या दिग्दर्शकांविरोधात १०० कोटी रुपये चुकीच्या मार्गाने खिशात टाकल्याचं लक्षात आणत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी ही गायक, गीतकार, संगीतकार यांचा सहभाग असणारी आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. दरम्यान, या सोसायटीकडून असा आरोप करण्यात आला आहे की, यशराज फिल्म्स त्यांना दूरसंचार कंपनी, रेडिओ वाहिनी आणि संगीत प्रसारणाच्या इतर विविध माध्यमांकडून रॉयल्टी घेऊ देत नसल्याचं तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे. 


नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार या तक्रारीमध्ये यशराज फिल्म्स कंपनी, आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांच्या नावांचा उल्लेख आहे. तक्रारकर्त्यांचा असा दावा आहे, की इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीला कलाकार आणि संगीत निर्मात्यांकडून रॉयल्टी स्वीकारण्याचा विशेषाधिकार प्राप्त आहे. पण, यशराज फिल्म्सकडून अनधिकृतपे ही रॉयल्टी स्वीकारली जात असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांकडून मिळाली. 



सूत्रांच्या माहितीनुसार यशराज फिल्म्स कंपनी आणि त्याच्याशी संलग्न दिग्दर्शकांनी आतापर्यंत इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीच्या सदस्यांची जवळपास १०० कोटींची रॉयल्टीची रक्कम कमवली आहे. सदर प्रकरणी आता, भारतीय दंडसंविधानान्वये येणाऱ्या कलम ४०९, कलम ३४ आणि स्वामीत्व अर्थात कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणी यशराज फिल्म्सकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुढील माहिती प्रतिक्षेत आहे.