`भाभीजी...` फेम अभिनेत्रीच्या घरी आग
गुरूवारी सकाळी सौम्याने ट्विट करत घरात आग लागल्याची माहिती दिली.
मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री सौम्या टंडन हिच्या घरी आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती स्वत: सौम्याने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. गुरूवारी सकाळी सौम्याने ट्विट करत घरात आग लागल्याची माहिती दिली. तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये घराच्या आत संपूर्ण जळून खाक झाल्याचं दिसत आहे.
सौम्याने जळलेल्या घराचे फोटो पोस्ट केले आहेत. 'माझ्या घरात आग लागली आहे. या घटनेमुळे मला चांगली शिकवण मिळाली आहे. पहिली गोष्ट बेडजवळ कधीही मच्छर मारण्याची जळती कॉईल लावून झोपू नये. तसंच कॉईलमधील लिक्विड संपल्यानंतर ते स्विचमध्ये लावून ठेऊ नये. दुसरी गोष्ट कधीही प्लग कनेक्शन लूज ठेऊ नये. आणि तिसरी गोष्ट आग विझवण्यासाठीची उपकरणं घरी ठेवा आणि त्याचा वापर कसा करायचा ते शिकून घ्या' असं ट्विट तिने केलं आहे.
सौम्याने केलेल्या या ट्विटनंतर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत विचारपूस केली आहे. त्यानंतर सौम्याने चाहत्यांना उत्तर देत मी आणि माझ्या घरातील सर्व जण ठीक असल्याचं सांगितलं आहे.
'भाभीजी घर पर है' मालिकेत अनीता भाभीची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने १४ जानेवारी रोजी मुलाला जन्म दिला होता. सौम्या तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा सौम्या मार्चमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.