मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने मागच्या काही वर्षांमध्ये लागोपाठ हिट चित्रपट दिले. अक्षय कुमारने कमवलेल्या या विश्वसनीयतेमुळे चित्रपट निर्मातेही त्याला बक्कळ पैसे देत आहेत. अक्षय कुमारने बॉलीवूडच्या तिन्ही खानना पिछाडीवर टाकत थेट हॉलीवूड सुपरस्टारच्या यादीत स्थान पटकावलं आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सने २०२० सालासाठी दिलेल्या यादीमध्ये अक्षय कुमार सर्वाधिक मानधन घेणारा एकमेव भारतीय अभिनेता आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार ५२व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारने हॉलीवूड सुपरस्टार विल स्मिथ, जेनिफर लोपेज आणि पॉप स्टार रिहाना यांना मागे टाकलं आहे. अक्षय कुमारची वार्षिक कमाई ४८.५ मिलियन डॉलर असल्याचं फोर्ब्सने सांगितलं आहे. 


आमची सहयोगी वेबसाईट Bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार फोर्ब्ससोबत झालेल्या बातचितीमध्ये अक्षय कुमार म्हणाला, 'स्वत:ला वेळेनुसार बदलावं लागतं. काळानुसार चित्रपटाच्या कथा बदलल्या आहेत. लोकांचे विचार आणि जगणं बदललं आहे. प्रेक्षकही बदलले आहेत, एवढच काय तर मी घेत असलेल्या चेकमध्ये असणाऱ्या शून्यांची संख्याही बदलली आहे. सगळ्या गोष्टी बदलत आहेत. हाच माझ्या यशाचा मंत्र आहे.'


अक्षय कुमार लवकरच रोहित शेट्टीचा चित्रपट 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे. याचसोबत अक्षय लक्ष्मी बम, बेलबॉटम आणि पृथ्वीराज या चित्रपटांमध्येही काम करत आहे.