मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सध्याचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांच्यावर टीका करत ते नियमांचं उल्लंघन करत असल्याचं म्हटलं आहे. निहलानी यांच्या आगामी 'रंगीला राजा' या चित्रपटातील बऱ्याच दृश्यांवर सेन्सॉरकडून कात्री लावण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आयएएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 


'हे सर्व काही व्यक्तीगत मतभेदांमुळे होत आहे. ज्यावेळी मी सेन्सॉरच्या अध्यक्षपदी होतो तेव्हा अनेकजणांचा माझ्यावर रोष होता, अनेकजण माझ्यावर नाराज होते. आता जेव्हा माझा चित्रपट प्रमाणित करण्यासाठी त्यांच्याकडे पोहोचला आहे, तेव्हा तो सर्व राग इथे काढला जात आहे. पण, मी काही इतक्यातच हार मानणार नाही', असं म्हणत निहलांनी यांनी न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याचा इशारा दिला आहे. 


प्रसून जोशी हे पक्षपात करत असून आमिरच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'वरही त्यांनी निशाणा साधला. सर्वांना आमिर आणि प्रसून जोशी यांच्यात असणारं नातं ठाऊक आहे. या चित्रपटाला लगेचच सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आलं. पण, 'रंगीला राजा' प्रदर्शित होण्याच्या ६० दिवस आधी प्रमाणित होण्यासाठी सेन्सॉरकडे पाठवला असता त्यातील बऱ्याच दृश्यांवर कात्री चालवण्यात आल्याचं त्यांन सांगितलं. 


सेन्सॉर बोर्डाच्या चित्रपट प्रमाणित करण्याच्या नव्या नियमांवर निशाणा साधत निहलानी यांनी आपल्या चित्रपटात कोणतेच आक्षेपार्ह संवात किंवा दृश्य नसल्याचं स्पष्ट केलं. याकरता त्यांनी एका दृश्याचं उदाहरण देत आपली बाजूही मांडली. 
प्रसून जोशी यांनी सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याशी आपली भेट आता थेट न्यायालयातच होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.