कार्डिअक अरेस्टमुळे अभिनेत्याचं निधन
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत `अबोध` चित्रपटात एकत्र काम केले होते.
मुंबई : तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते तापस पॉल यांचं कार्डिअक अरेस्टमुळे निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सकळी वांद्रे येथील हॉली फॅमेली रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे राजकिय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तापल पॉल हे ६१ वर्षांचे होते.
एएनआयच्या वृत्तानुसार त्यांचं निधन कार्डिअक अरेस्टमुळे झाल्याचं समोर आलं आहे. तापस पॉलयांनी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत 'अबोध' चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकारण त्याचप्रमाणे बांग्ला कलाविश्वात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.
तापस पॉल यांचा जन्म २९ सप्टेंबर १९५८ साली हुवली जिल्ह्यातील चंदननगरमध्ये झाला होता. तापस यांनी ७० पेक्षा जास्त बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. १९८४ साली रूपेरी पडद्यावर आलेल्या 'अबोध' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यात रस घेतला नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. २००१ साली त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. सलग दोनवेळा त्यांनी आमदारकीचा मान मिळवला.