`कौन बनेगा करोडपती` च्या नावाखाली होतेय फसवणूक? तुम्हालाही मेसेज आला असेल तर...
तुम्हालाही जर अशाप्रकारे मेसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा
मुंबई : सुप्रसिद्ध रीअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' या शो च्या नावाखाली नागरीकांना गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमध्ये गंडा घालणारे आरोपी प्रेक्षकांना मेसेज आणि कॉल करून ठगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हालाही जर अशाप्रकारे मेसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्हीही फ्रॉडला बळी पडाल. अशावेळेस नेमके करायचे काय हेच या बातमीत आपण जाणून घेऊयात.
कौन बनेगा करोडपती KBC हा प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेकांनी सहभाग घेत भरघोस रोख रक्कम आणि बक्षिसे मिळवली होती. मात्र याच शो च्या नावाखाली आता नागरिकांना ठगण्याचा प्रयत्न सूरू आहे. यासाठी नागरीकांना व्हॉटसअॅप मेसेजिंगद्वारे मेसेज आणि व्हॉटसअॅप कॉल करून त्यांना प्रलोभने देण्याचा प्रयत्न केला जातो.
कसा गंडा घातला जातो?
डिजिटल पेमेंटला सुरूवात झाल्यापासून चोरंही डिजिटल झाले आहेत. चोरांनीही तंत्रज्ञानाद्वारे चोरी करण्यात हातखंड मिळवला. आता केबीसीत लॉटरी लागल्याचे मेसेज अथवा व्हॉटसअॅप कॉल करून सामान्यांना गंडवण्याचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे.
5000 नागरीकांमधून तुमचा मोबाईल नंबर निवडला गेला आहे. ही लॉटरी मिळवण्यासाठी तुम्हाला लॉटरी मॅनेजरला व्हॉटसअॅप कॉल करावा लागेल. ते तुम्हाला लॉटरी मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगतील, अशी सर्वप्रथम माहिती देत सामान्यांना आमिष देण्याचा प्रयत्न करतात. तसेच व्हॉटसअॅप मेसेंजिंगमध्ये तुम्हाला केबीसीत लॉटरी लागल्याचे आमिष देणारे मेसेज पाठवले जातात.