दहा वर्षांपासून सलमान देतोय चाहत्यांना चित्रपटांची `ईदी`
सलग १० वर्षांपासून ईदच्या दिवशी सलमानचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
मुंबई : बॉलिवूड दबंग खान सलमानच्या 'भारत' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून मोठी चर्चा होती. अखेर आज ईदच्या मुहूर्तावर 'भारत' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ईद सलमान खानच्या करियरमध्ये टर्निंग पॉईंट म्हणून आली आणि २००९ मध्ये आलेल्या सलमानच्या 'वॉन्टेड' चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत सलमान खानला एक नवीन ओळख दिली. या चित्रपटानंतर सलमानचे मोठे चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होऊ लागले. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट सलमान खानसाठी खास असतात. २००९ ते २०१९ या दहा वर्षांच्या प्रवासात सलमानने अनेक मोठे चित्रपट दिले आहेत.
२००९ मध्ये प्रभु देवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. 'वॉन्टेड' सलमानचा पहिला ईद रिलीज चित्रपट होता. १८ सप्टेंबर २००९ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता.
अरबाज खान दिग्दर्शित 'दबंग' २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या ईद रिलीजने बॉक्स ऑफिसवर चुलबुल पांडेला हिट केलं होतं. या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही चांगलीच प्रसिद्ध झाली. 'दबंग' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
सलमान खान आणि करिना कपूर ही जोडी २०११ मध्ये 'बॉडीगार्ड'मधून पहिल्यांदाच एकत्र आली. 'बॉडीगार्ड' बॉक्सऑफिसवर हिट ठरलाच पण या चित्रपटातील गाणी आजही अनेकांच्या मनात घर करुन आहेत. 'बॉडीगार्ड'देखील सलमानच्या ईद रिलीजपैकीच एक चित्रपट आहे.
२०१२ या वर्षी बॉलिवूडला एक नवा टायगर मिळाला. कबीर खान दिग्दर्शित 'एक था टायगर'ने बॉक्स ऑफिसवर सारे रेकॉर्ड तोडत ३२० कोटींचा गल्ला जमवला होता. सलमानच्या या ईद रिलीजने सर्वांनाच आश्चर्यचकित करत बॉक्स ऑफिसवर सर्वात हिट चित्रपटांच्या यादीत नाव मिळवले.
'एक था टायगर'नंतर २०१४ मध्ये सलमानने पुन्हा जबरदस्त एन्ट्री करत ईदच्या दिवशी 'किक' चित्रपट प्रदर्शित झाला. 'किक' आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये सामिल होत तब्बल ४२० कोटींची कमाई केली.
२०१५ मध्ये कबीर खान आणि सलमान खान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडाली. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान'ने वर्ल्डवाइड ९०० कोटींची कमाई करत नवा रेकॉर्डच केला. चित्रपटात मुन्नी आणि सलमानच्या जोडीने सर्वांचीच मनं जिकली. 'किक'नंतर 'बजरंगी भाईजान'मध्ये सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकीची जोडी पुन्हा एकदा कमाल करुन गेली.
सलमानच्या सर्वात मोठ्या ईद रिलीज चित्रपटांमध्ये 'सुलतान'चाही समावेश आहे. या चित्रपटातून सलमान आणि अनुष्का शर्मा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. चित्रपटाने ६०० कोटींची कमाई केली. २०१६ मध्ये 'सुलतान' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता.
२०१७ मध्ये ईदच्या दिवशी सलमानचा 'ट्यूबलाइट' चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चाहत्यांपासून ते चित्रपट समिक्षकांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटावर टीका केली होती. परंतु तरीही चित्रपटाने २०० कोटींच्या जवळपास कमाई केली होती.
रेस सीरिजपैकी तिसरा चित्रपट 'रेस ३' ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला. रेमो डिसूजा दिग्दर्शित 'रेस ३' मध्ये संपूर्ण नवीन स्टार कास्ट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही आणि पुन्हा एकदा सलमानला टीकेचा सामना करावा लागला. 'रेस ३'ने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली होती.
आता पुन्हा एकदा सलमान खानच्या ईद रिलीजमध्ये 'भारत' चित्रपटही सामिल झाला आहे. चित्रपट समिक्षकांनी 'भारत'ला ३ ते ४ स्टार दिले आहेत.
'भारत' चित्रपटासह सलमानच्या ईद रिलीज चित्रपटांनी एक दशक पूर्ण केलं आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित होणारा भारत हा सलमानचा सलग १०वा चित्रपट ठरला आहे.