ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली. आपल्या दमदार अभिनय आणि देखणेपणामुळे त्यांनी एक काळ गाजवला होता. 15 जुलै रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडेतील भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांची मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) प्रसारमाध्यमांपासून दूरच होता. पण नुकतंच त्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आईच्या प्रकृतीसंबंधी माहिती दिली. दरम्यान, यावेळी एका चाहत्याने वडिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तो थोडासा नाराज झाल्याचं दिसलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गश्मीर महाजनीने 30 जुलैला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्याने चाहत्यांना आपल्याला प्रश्न विचारण्यास सांगत त्यांची उत्तर दिली. यावेळी त्याने आपल्या आईच्या प्रकृतीबद्दलही सांगितलं. दरम्यान, एका प्रश्नावर तो काहीसा नाराज झाला. 


श्रद्धांजली वाहणं नकोसं झालं! रविंद्र महाजनींच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट, गश्मीरचा उल्लेख करत म्हणाली...


 


एका चाहत्याने गश्मीर महाजनीला त्याच्या आणि आईच्या प्रकृतीबद्दल विचारलं असता त्याने उत्तर दिलं की, "माझी आई आता सावरत आहे. आम्ही यातून लवकरच बाहेर पडू". पुढे त्याने म्हटलं आहे की, "आईची प्रकृती बरी झाल्यानंतर मी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे. काहीही झालं तरी मी पुन्हा नव्याने झेप घेईन. शेवटी मला कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुका मी करणार नाही".



गश्मीरने यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचं सांगितलं. "होय, काही मोजक्या कुशल लोकांनी मला फोन करून पाठिंबा दिला. विशेषत: प्रवीण तरडे, रितेश देशमुख आणि मृण्मयी देशपांडे यांनी मला पाठिंबा दिला असून, ते मी कधीच विसरणार नाही". यावेळी त्याने अक्षय, श्रीधर आणि रमेश परदेशी या आपल्या मित्रांचाही उल्लेख केला. 



दरम्यान एका चाहत्याने यावेळी गश्मीरला, एखादी अशी गोष्ट सांग जी तू तुझ्या वडिलांना सांगितली नसतीस? असं सांगितलं. त्यावर गश्मीरने म्हटलं की "जे मी माझ्या वडिलांना सांगू शकत नाही, ते तुला का सांगू?". तसंच एका चाहत्याने त्याला वडिलांबद्दल काही शब्द लिहिण्यास सांगितलं. त्यावर त्याने उत्तर दिलं की, "मी तेराव्याला जे काही बोलायचे ते शब्द बोललो आहे. तुला ते जाणून घेण्याची गरज नाही".




रवींद्र महाजनी यांचं निधन


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 77 वर्षीय रवींद्र महाजनी यांचा मृतदेह 14 जुलै रोजी आढळला. पण तीन दिवस आधीच त्यांचं निधन झाल्याची शक्यता आहे. 


"या फ्लॅटमध्ये रवींद्र महाजनी एकटेच राहत होते. आम्हाला शेजाऱ्यांचा फोन आला होता. त्यांनी आम्हाला घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली. आम्ही घटनास्थळी गेलो आणि फ्लॅटचा दरवाजा तोडला असता ते मृतावस्थेत आढळले," अशी माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, रवींद्र महाजनी गेल्या आठ महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. 


1970-80 च्या दशकात रवींद्र महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली. मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले होते.