मुंबई : पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक काळ होता, मराठी चित्रपटसृष्टीवर मुंबई-पुणे-कोल्हापूरचे राज्य होते. निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांबरोबर सिनेक्षेत्रातील इतर मंडळीही इथलीच होती. त्यात तमाशाप्रधान, कौटुंबिक आणि विनोदी फार्स असलेल्या चित्रपटांचा भरणा जास्त होता. पण, अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून सामाजिक समस्यांकडे डोळसपणे पाहणारे, उत्तम वैचारीक बैठक असलेले आणि मनोरंजकतेची व सिनेतंत्राची उत्तम जाण असलेले तरूण सिनेसृष्टीत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करत आहेत. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे यांचे... अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेल्या नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या गावरान ठसक्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. स्थानिक सामाजिक प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातून वाचा फोडताना, दोघांनीही आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडलं. आता याच अहमदनगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशनचा तिसरा विद्यार्थी... दूरवस्था झालेल्या शालेय शिक्षण व्यवस्थेमुळे संभ्रमात असलेल्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालायला सज्ज झाला आहे. त्याचं नाव आहे महेश रावसाहेब काळे...


महेशचा निर्धार...


वयाच्या अवघ्या २३ वर्षी महेश काळे यांनी एकलव्याप्रमाणे नागराज आणि भाऊला गुरू मानून 'घुमा' या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली. महेशने कॉलेजमध्ये शिकत असताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून 'रुपया' नावाची एक शॉर्टफिल्म बनवली आणि त्यासाठी त्याला २०१४ या वर्षीचा कोलकत्याच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा 'नॅशनल स्टुडण्ट फिल्म ॲवॉर्ड' मिळाला. त्याआधीच डोक्यात 'घुमा'ची कथा घोळत असलेल्या महेशने फिचर फिल्म बनविण्याचा निर्धार केला आणि मंगेश जोंधळे, अविनाश मकासरे आणि विक्रम शंकपाळे या कॉलेच्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन 'घुमा' चित्रपटाच्या निर्मितीची तयारी सुरू केली.


अशी सुचली 'घुमा'ची कथा...


'सधन बागायतदारांनी आपली मुलं नव्याने थाटलेल्या चकचकीत इंग्रजी शाळेत घातल्यानंतर गावातील आर्थिकदृष्ट्या जेमतेम आणि अशक्त असलेल्या इतर पालकांनाही इंग्रजी शाळेची स्वप्न पडू लागली... आणि मग जो तो आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी घुम्यासारखे वणवण भटकताना मी प्रत्यक्ष पाहिलंय. परिस्थिती इतकी चिघळली की काही जण दागिने, वावर गहाण टाकून प्रवेश घेऊ लागले. गावाकडं जिथे जावं तिथं एक-दुसऱ्याच्या शाळा प्रवेशाच्या यशापयशाच्या कथा मीठ-मसाला लावून चवीने चघळू लागल्या... आणि मला कथा सुचली' असं महेश काळे यांनी म्हटलंय.


महेश रावसाहेब काळे

 


'ख्वाडा'ची पुनरावृत्ती नको म्हणून...


एकुलत्या एक मुलाच्या चित्रपट बनविण्याच्या स्वप्न पूर्तीसाठी वडील रावसाहेब काळे यांनी शेतीवर कर्ज काढले. 'ड्रीमसेलर फिल्म्स' ही संस्था स्थापन करून शुटींग सुरू झालं. पुढे लागेल तसं एकेक करून अठरा गायी विकून टाकल्या आणि आणखी पैसे उभे केले... परंतु, तितक्याने भागणारे नव्हते. मग, महेशचे मामा शरद कोठुळेंनी भाच्यासाठी थोडा हातभार लावला. इतर नातेवाईक, परिचितांकडून उधार-उसनवारी केली. तरीही, गणित काही केल्या जुळेना... अखेर नगर शहरातील मदन आढाव, आदिनाथ धानगुडे, सारंग बारस्कर आणि संतोष इंगळे हे चार तरूण उद्योजक पुढे आले. चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य ओळखून आणि आपल्याच नगर जिल्ह्यातून आणखी एक उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर यावी, या हेतुने या चौघांनी पूर्णपणे आर्थिक पाठबळ दिले. 'घुमा' हा चित्रपट निर्मिती आणि प्रदर्शित करण्याचे या चौघांनी शिवधनुष्य उचलले. 'ख्वाडा' या चित्रपटाचा पूर्वानुभव पाहता, पैशाअभावी ग्रामीण भागातील उत्तम कलाकृती आणि कलाकार दबून राहू नये म्हणून 'घुमा'च्या निमित्ताने या चारही उद्योजकांनी 'मास फिल्म्स' या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली आहे.


अंतर्मुख करणारा 'घुमा'


आड्यात नसतानाही पोहऱ्यात जबरदस्तीने आणण्याच्या नादात, प्रस्थापितांच्या टाचेखाली दबलेल्या एका शेतकरी बापाची आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत दाखल करण्याची केविलवाणी धडपड 'घुमा' या चित्रपटातून पडद्यावर आणण्यात महेश काळे यांनी आपल्या सिनेतंत्राचं कसब पणाला लावले आहे. एकूणच शिक्षण व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्याचा उत्तम धांडोळा घेताना मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आणि घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांचं मनोबल उंचावणारा 'घुमा' प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला लावेल. या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परिक्षक पसंतीचा पुरस्कार आणि राज्य पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर पासून प्रदर्शित होत आहे.