'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) 50 लाख जिंकणाऱ्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) महसूल विभागात कार्यरत महिला अधिकाऱ्याने तहसीलदार पदाचा राजीनामा दिला होता. अमिता सिंह तोमर (Amita Singh Tomar) राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याचं कारण अमिता सिंग तोमर यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अमिता सिंग या शेवपूर येथे कार्यरत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती'मध्ये दशकभरापूर्वी अमिता सिंह तोमर सहभागी झाल्या होत्या. यावेळी 50 लाख जिंकल्याने त्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. 


अलीकडेच, शेवपूर नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कामाची विभागणी केली होती. पण अमिता तोमर नाराज झाल्या होत्या. आपल्याला महत्त्वाची कामं देण्यात आली नाहीत यामुळे त्या नाराज  झाल्या होत्या. आपल्या ज्येष्ठतेकडे दुर्लक्ष केले गेले आहे असं सांगत त्यांनी आपण राजीनामा देण्यास प्रवृत्त झाल्याचं म्हटलं.


"गेल्या 5 वर्षांपासून माझा सतत अपमान होत आहे. जेव्हा नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा मला तहसीलचा कार्यभार सोपवला जाईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. आता मला मानसिकरित्या फार त्रास होत आहे," असं अमिता सिंह तोमर यांनी राजीनामापत्रात लिहिलं होतं. 


अमिता तोमर गेल्या 5 वर्षांपासून वेगवेगळ्या विभागात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कोणतीही ठराविक जबाबदारी देण्यात आलेली नाही. सध्या, त्या जमिनीच्या नोंदी पाहणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याच्या पदावर आहेत.


शनिवारी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाचही तहसीलच्या तहसीलदारांची नियुक्ती केली तेव्हा नाराज झालेल्या अमिता तोमर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सोपवला. त्यांचं राजीनामापत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. 


अमिता तोमर यांनी जाहीरपणे कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला होता. आपली मानसिक स्थिती योग्य नाही सांगत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं होतं. पण दुसऱ्याच दिवशी अमिता तोमर यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करत आपला राजीनामा स्विकारु नये अशी विनंती केली. 


जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी सांगितलं की, "तहसीलदार अमिता सिंह या वरिष्ठ तहसीलदार आहेत आणि त्यांनी येथे चार वर्षं पूर्ण केली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांची बदली होणार होती. त्यामुळेच त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, वरिष्ठ तहसीलदार असल्याने अशी कारवाई योग्य नाही. याबाबत वरिष्ठांकडे लक्ष वेधले जाईल".


2019 मध्ये, फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याबद्दल अमिता तोमर यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर धार्मिक उल्लेख करत अपशब्द वापरल्याचा आरोप होता. तसंच 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिल्यानंतरही त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी पत्रात वारंवार होणाऱ्या बदलीचा मुद्दा मांडला होता.