बॉलिवूड अभिनेता शेखर सुमनने संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी'मधून रुपेरी पजद्यावर पुनरागमन केलं आहे. शेखर सुमन यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जात आहे. यानिमित्ताने शेखर सुमनने Bollywood Bubble सह संवाद साधताना आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमधील आठवणींना उजाळा दिला. 1984 मध्ये 'उत्सव' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या शेखर सुमनने तेव्हा अगदी नवखी असणाऱ्या माधुरी दीक्षितसोबत काम केल्याचा किस्सा सांगितला. जेव्हा आपण एकत्र काम करत होतो, तेव्हा माधुरी दिक्षितला बाईकवरुन पिकअप करायचो असा खुलासा त्याने केला. शेखर सुमनने सांगितलं की, "उत्सव चित्रपटाला विलंब झाला होता. यादरम्यान मला मानव हत्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचा फोन आला. चित्रपटात मला एका पत्रकाराची भूमिका निभवायची होती".


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेखर सुमनने सांगितलं की, "दिग्दर्शकाने सांगितलं की, माझ्याकडे पैसे फार कमी आहेत. त्याने फक्त 5 हजारांची ऑफर दिली. मला त्यावेळी उत्सव चित्रपटासाठी 25 हजार रुपये मिळाले होते. मला 10 हजार आधीच देण्यात आले होते. जेव्हा मला 5 हजारांची ऑफर दिली, मला थोडं वाईट वाटलं होतं. त्यांना चित्रपटासाठी हिरोईनही मिळाली नव्हती. त्यांनी मला माधुरी नावाची नवी हिरोईन असल्याचं सांगितलं. मी तिची भेट घडवून देण्यास सांगितलं. मला त्यांनी चित्रपट करणार का असं विचारलं असता मी होकार दिला".


पुढे त्याने सांगितलं की, "मी नक्कीच चित्रपट करेन असं सांगितलं. जर रेखाजी मी नवा असतानाही माझ्यासोबत काम करु शकतात तर मी एका नव्या अभिनेत्रीसोबत काम का करु शकत नाही असा विचार केला. आम्ही माधुरी दीक्षितच्या घरी जाऊन भेट घेतली. तिने बाहेर येण्यासाठी थोडा वेळ घेतला. जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा ती तेजस्वी आणि सुंदर दिसत होती. मी दिग्दर्शकाला सांगितले की तुमचा चित्रपट सुरू होणार आहे आणि मी तो करीन ".


"हा आमचा दोघांचाही दुसरा चित्रपट होता आणि निर्माता येऊन सांगतो की, आमच्याकडे लोकेशनसाठी पैसे नाहीत, तुमचं घर शुटिंगसाठी मिळेल का? मी म्हणालो अरे भाई तू आता थोड्या दिवसांनी माझ्याकडून पैसे घे आणि शूट कर. घऱ पण घे, कपडे पण घे., मोटरसायकलपण घे. जे करायचं ते करा, जे घ्यायचं ते घ्या. त्यावर तो म्हणाला माधुरीला आणण्यासाठी पैसे नाहीत, तू तिला पिक करण्यासठी जाशील का?," असा किस्सा शेखर सुमनने सांगितला. 


यानंतर त्याने सांगितलं की, "मी माधुरी दीक्षितला बाईकवरुन आणायला जायचो. नंतर म्हणाले मेकअपसाठी पैसे नाहीत. माझी बायको अलका चांगली दिसते तिला मेकअप करायला सांगा असं म्हणाले. यानंतर अलका माधुरी दीक्षितचा मेकअप करत असे. कपडे पण हवे होते. अलका तिचे कपडे देत असेल. बिचारी माधुरी दीक्षित फारच गोड आणि भोळी होती. निर्माते जे सांगायचे ते ती करायची. मी तिला शूटनंतर ड्रॉप करायचो. नंतर तिला डान्स प्रॅक्टिसला घेऊन जायचो. चित्रपट कसातरी पूर्ण झाला होता".


शेखर सुमनने सांगितले की, अनुभव या तिसऱ्या चित्रपटात तो माधुरी दीक्षितसोबत काम करणार होता. पण तिची जागा पद्मिनी कोल्हापुरे यांनी घेतली. अभिनेता म्हणाला, “माझ्या तिसऱ्या चित्रपट अनुभवमध्ये देखील माधुरीची भूमिका होती, परंतु दोन दिवसांनंतर, तिची जागा पद्मिनी कोल्हापुरेने घेतली, जी त्यावेळी खूप मोठी स्टार होती. तो चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला”.