#Throwback : ...म्हणून कपूर कुटुंबातील महिलांना सिनेसृष्टीत होती बंदी
काही प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक म्हणजे `कपूर`.....
मुंबई : हिंदी कलाविश्वाने आज संपूर्ण विश्वात आपलं अनोखं स्थान निर्माण केलं आहे. अनेक दशकांचा सुवर्णमयी इतिहास असणाऱ्या या झगमगणाऱ्या दुनियेत अनेक कलाकारां, त्यांच्या कुटुंबाचं मोलाचं योगदान आहे. अशाच काही प्रतिष्ठीत कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर.....
चित्रपट निर्माते, दिग्दर्सक पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबाने हिंदी कलाविश्वाला अनेक नवे आणि तितकेच निपुण चेहरे दिले. आजही त्यांच्या या प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण पिढी चित्रपट विश्वात सक्रीय आहे. पण, तुम्हाला माहित आहे का, या कुटुंबातील महिला आज कलाविश्वात नावारुपास आल्या असल्या तरीही फार वर्षांपूर्वी मात्र त्यांच्यावर काही निर्बंध होते.
महिलांनी चित्रपट विश्वात काम करण्याला पृथ्वीराज कपूर यांचा तीव्र विरोध होता. कुटुंबातील महिलांनी या क्षेत्रात काम करु नये यासाठी त्यांनी जणू बंदीच घातली होती. त्यामुळे ही बंदी कायम असती तर आज, अभिनेत्री करिना कपूर आणि करिष्मा कपूर हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आलेच नसते.
पृथ्वीराज कपूर यांच्या निर्णयामुळे बबीता आणि नीतू सिंग या दोन्ही अभिनेत्रींनीसुद्धा कपूर कुटुंबात सूनेच्या रुपात प्रवेश केल्यानंतर चित्रपट सृष्टीतून काढता पाय घेतला होता. ते अतिशय कठोर स्वभावाचे होते असं नाही. किंबहुना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी आणि अनेक मिटिंगमध्ये ते बहिणीसोबत जात. शांता कपूर या बहिणीची अनेकदा त्यांना साथ असे असंही म्हटलं जातं.
असं म्हणतात की, एक दिवस 'फिल्म इंडिया' या मासिकाचे संपादक आणि प्रकाशक बाबूराव पटेल यांनी शांता कपूर यांना चित्रपटात काम करण्यास सांगितलं. पण, त्यांचा सांगण्याचा अंदाज पृथ्वीराज यांना पटला नाही. हिंदी कलाविश्वात त्यानंतर बऱ्याच काळासाठी कपूर कुटुंबातील महिलांनी प्रवेश केला नाही.
अभिनेत्री करिष्मा कपूर हिच्या पदार्पणाच्या वेळी खुद्द शांता कपूरच म्हणाल्या होत्या की, 'कोणी सुना आणि मुली चित्रपटांमध्ये काम करणार नाही, ही एक प्रथाच झाली होती. या क्षेत्रात महिलांचं शोषण होत असल्याच्या मुद्द्यावरुनच हा निर्णय घेण्यात आला होता.' पृथ्वीराज कपूर यांच्या त्या एका निर्णयानंतर बरीच वर्षे या कुटुंबातील महिला रुपेरी पडद्यापासून दूर होत्या. पण, अखेर करिना आणि करिष्माने पुन्हा नवा पायंडा पाडत अभिनय विश्वावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं.