`यादों की बारात` फेम अभिनेत्याचं निधन
कलाविश्वात शोककळा
मुंबई : 'यादों की बारात' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते इम्तियाज खान यांचं सोमवारी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. 'प्यारा दोस्त', 'नूर जहाँ' या चित्रपटातील भूमिकांसाठीही ते ओळखले जात होते. १५ ऑक्टोबर, १९४२ला पेशावर येथे जन्मलेल्या खान यांचं खरं नाव Zecharian Khan.
चित्रपट वर्तुळात प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्यांनी आपली ओळखच बदलत इम्तियाज खान हे नाव लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. खान यांच्या निधनाने कलाविश्वातून अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेता अमजद खान यांचे भाऊ म्हणूनही इम्तियाज खान यांची ओळख होती. अभिनेत्री कृतिका देसाईशी ते विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या पश्चात पत्नी कृतिका आणि मुलगी आएशा खान असा परिवार आहे.
खान यांच्या निधनानंतर अभिनेता जावेद जाफरीने त्यांचा एक फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. एक दमदार अभिनेता आणि एक उत्तम व्यक्तीमत्त्वं, या शब्दांत खान यांचं वर्णन करत जाफरी यांनी या कलाकाराच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं.
पाहा, कोरोनाच्या दहशतीत इटलीमध्ये असा सुरु आहे जगण्याचा 'सुरेल' संघर्ष
अभिनेत्री अंजू मेहेंद्रू यांनीही त्यांच्या सहकलाकाराच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलं. 'वन्स अपॉन अ टाईम.... ', असं लिहित त्यांनी इम्तियाज खान यांच्या कुटुंबासमवेत असणारा एक फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहिली.