१५ ऑगस्ट: शहीद कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबियांसोबत `होम मिनिस्टर`चा स्पेशल एपिसोड
१५ ऑगस्ट निमित्त स्पेशल ऐपिसोड
मुंबई : दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महाराष्ट्राचे सुपूत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. कौस्तुभ राणे शहीद होऊन एक वर्ष झाला आहे. कनिका यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षाही अव्वल गुण घेत पास केल्या आहेत. या वीरपत्नीचा हा निर्णय आणि सैन्यदलाबद्दलचा अभिमान नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या या सुपुत्राला वीरमरण आले होते. कौस्तुभ राणे हे मीरा रोड येथील शितलनगर येथे राहत होते. भारतीय सैन्याच्या 36 रायफल बटालियनमध्ये ते मेजर म्हणून कार्यरत होते. 7 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी दहशतवाद्यांशी लढताना या भूमिपुत्राने देशासाठी बलिदान दिले. या वृत्ताने मुंबईसह महाराष्ट्रावर हळहळला होता. तर राणे कुटुंबियांचा अभिमानही अवघा देश बाळगत होता. आता, पुन्हा एकदा राणे कुटुबीयांचा आणि शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नीचा देशाला अभिमान वाटणार आहे.
शहीद मेजर कौस्तुभ राणे 7 ऑगस्ट २०१८ ला शहीद झाले होते. पतीच्या निधनानंतर या धक्क्यातून, दुःखातून स्वतःला सावरत, एका छोट्या मुलाचा सांभाळ करत शहीद मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १५ ऑगस्टला होम मिनिस्टरच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण या वीर जवानाच्या कुटुंबियांना भेटणार आहोत.