नवी दिल्ली : बॉलिवूड प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंह एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हनी सिंहच्या 'मखना' या गाण्यावर पंजाब राज्य महिला आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यात वापरण्यात आलेल्या काही शब्दांवर महिला आयोगानं नाराजी व्यक्त केलीय. या गाण्यात महिलांविषयी काही अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आल्याची तक्रार करत महिला आयोगानं पोलीस स्टेशन गाठलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य महिला आयोगच्या अध्यक्ष मनिषा गुलाटी यांनी या संदर्भात एक लेखी तक्रार देत हनी सिंहविरोधात कारवाईची मागणी केली आहे. मनिषा यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही पोलिसांना 'मखना' गाण्यात महिलांविरुद्ध वापरण्यात आलेल्या अश्लील शब्दांच्या वापराविरोधात हनी सिंहविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली केलीय. अशा प्रकारच्या महिलांविषयी गायल्या गेलेल्या आक्षेपार्ह गाण्याला पंजाबमध्ये बॅन करण्यात यावं', अशी मागणी केल्याचंही मनिषा गुलाटी यांनी म्हटलंय. 


कित्येक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब असणाऱ्या हनी सिंहने २०१८ मध्ये 'मखना' गाण्यातून कमबॅक केलं. टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनेलवर 'मखना' प्रदर्शित करण्यात आलं होतं. हनी सिंहनेच या गाण्याच्या ओळी लिहिल्या असून, हनी आणि नेहा कक्कर यांनी हे गाणं गायलं आहे. गाणं प्रदर्शित झाल्याच्या काही वेळातच या गाण्याला यूट्यूबवर प्रेक्षकांची चांगलीच पसंतही मिळाली होती. मात्र आता या गाण्यातील आक्षेपार्ह ओळीविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर हे गाणं वादग्रस्त ठरलंय.


याआधीही २०१३ मध्ये हनी सिंहच्या 'मै बलात्कारी हू' या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता 'मखना'विरोधात काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.