कंगना, हृतिकला बसणार `ठाकरे`चा फटका?
हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
मुंबई : यंदाच्या वर्षअखेर फक्त राजकारणातच नव्हे तर संपूर्ण कलाविश्वातही बऱ्याच घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध विषयांवर प्रकाशझोत टाकत ऐतिहासिक, राजकीय आणि काल्पनिक अशा मुदद्यांना हाताळणाऱ्या कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षअखेर या चित्रपटांची चर्चा असली तरीही ते पुढच्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अशा या चित्रपटांच्या यादीत चुरशीची स्पर्धा आहे ते म्हणजे नवाझुद्दीन सिद्दीकीची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'ठाकरे', कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' आणि हृतिक रोशन याच्या 'सुपर ३०' या चित्रपटांची.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वादळी व्यक्तीमत्वावर भाष्य करणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र त्याचीच चर्चा होऊ लागली. बाळासाहेबांची एकंदर कारकिर्द पाहता या चित्रपटातून नेमका कोणकोणत्या प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, याची कल्पनाही अनेकांना आली. ज्यानंतर एका शिवसेना कार्यकर्त्याने २५ जानेवारी या दिवशी इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याविषयी एक पोस्ट केली. त्याची ही पोस्ट हा पूर्णपणे भावनिक मुद्दा असल्याचं सांगच संजय राऊत यांनी ती पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं सांगितलं.
कार्यकर्त्याच्या या पोस्टनंतर एक मुद्दा मात्र सिनेप्रेमी रसिकांच्या मनात प्रश्न उभा राहत आहे. तो म्हणजे २५ जानेवारी याच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या हृतिक आणि कंगनाच्या चित्रपटांना 'ठाकरे'चा फटका बसणार का? राजकारण, कला आणि एकंदरच प्रेक्षकांचा कल या गोष्टी येत्या काळात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील हेसुद्धा तितकच खरं.
मुंबई, महाराष्ट्रात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची लोकप्रियता, समाजात असणारं त्यांचं स्थान पाहता आता ठाकरेच्या वाट्याला नेमक्या किती स्क्रीन येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे स्क्रिन्स, प्राईम टाईम शोचं हे एकंदर गणित कसं असणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. 'ठाकरे', 'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी' आणि 'सुपर ३०' या तिन्ही चित्रपटांमधून अशा काही व्यक्तींचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे ज्याचं योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा आता ही लढत बॉक्स ऑफिसवर कोणाच्या पारड्यात य़श टाकणार आणि कोणाला याचा फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.