Prasad Oak : आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपली छाप सोडली आहे. त्यामुळे प्रसाद ओक हा चित्रपटसृष्टीतील (marathi movie) लोकप्रिय चेहरा आहे. प्रसाद ओकने (Prasad Oak) दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी (chandramukhi) आणि धर्मवीर (dharmaveer) चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असतो. चित्रपटसृष्टीप्रमाणे प्रसाद ओक सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद ओकसोबत त्याची पत्नी मंजिरी ओकसुद्धा त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या रोजच्या आयुष्यातील अपडेट दोघेही सोशल मीडियावर देत असतात. अशातच आता प्रसाद ओकने एका मुलाखतीमध्ये नातेवाईकांबद्दल परखड मत व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातेवाईक हा अत्यंत किचकट आणि वैताग आणणारा प्रकार असल्याचे प्रसाद ओकने म्हटले आहे. तसेच नातेवाइकांनीच प्रचंड विरोध केला, त्यावेळी मंजिरी त्याच्यासोबत उभी होती, असेही प्रसाद म्हणाला आहे. त्याच्या या विधानानंतर चर्चा सुरु झाल्या आहेत. इसापनीती नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही मुलाखत शेअर करण्यात आली आहे. प्रसाद ओकची ही मुलाखत सध्या व्हायरल होतेय.


काय म्हणाला प्रसाद ओक?


"माझ्या यशात मंजिरीचा 100 टक्के वाटा आहे. 1996 साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी 1998 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर 1999 मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला, अशी आठवण प्रसादने सांगितली.


नातेवाईकांच्या मुलांसोबत फोटो काढायला आवडत नाही


"या संपूर्ण काळात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण आणि नातेवाईक हे सगळं तिने सांभाळलं. नातेवाईक हा अत्यंत किचकट आणि अत्यंत वैताग येणारा प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असती असं मला ऐकवलं जायचं. आज 22-25 वर्षांनंतर हेच नातेवाईक त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात. पण हेही मला आवडत नाही," असे प्रसादने म्हटले.



मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने


"नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो. त्यांच्याकडून कधीच काही चांगलं मला मिळालं नाही. मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने दिलं. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले. आईने मला गाणं दिलं. पण नातेवाईकांनी मला काहीच दिलं नाही. आज ते ही मुलाखत पाहत असतील तर त्यांना कदाचित वाईट वाटत असेल. पण वाटू दे. त्याला मी काहीच करू शकत नाही," असे परखड मत प्रसाद ओकने व्यक्त केले.