नेहा पेंडसेनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनूभव
मी टू मोहिमेचं वादळ सध्या उठलं आहे.
मुंबई : मी टू मोहिमेचं वादळ सध्या उठलं आहे. त्यातच अभिनेत्री नेहा पेंडसेनं तिला आलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला एक रात्र एकत्र घालवण्याबद्दल ऑफर केल्याचं नेहानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी दिलेल्या या ऑफर मी धुडकावून लावल्या. पण ज्या लोकांनी या ऑफर स्वीकारल्या ते आज टॉपवर आहेत. या क्षेत्रामध्ये गॉडफादर असणं गरजेचं आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कास्टिंग काऊच कराल, असं नेहा म्हणाली.
नेहा पेंडसेनं चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. वयाच्या १०व्या वर्षापासून नेहा या क्षेत्रात आहे.
१९९९ साली नेहा पेंडसे प्यार कोई खेल नही, या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. याचबरोबर दक्षिणेतल्या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे. दाग द फायर, देवदास, तुमसे अच्छा कौन, या चित्रपटांमध्येही नेहानं भूमिका केल्या. २९ नोव्हेंबर १९८४ ला मुंबईतल्या एका मध्यमवर्गातल्या परिवारामध्ये नेहाचा जन्म झाला. नेहाच्या कुटुंबातलं कोणीच या क्षेत्रात नव्हतं.