`...म्हणून मी `लालबाग परळ` चित्रपट नाकारणार होतो`, अंकुश चौधरीने सांगितला किस्सा
महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन असलेला `लालबाग परळ` हा चित्रपट चांगलाच गाजला. मुंबईतील मिल कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.
Ankush Chaudhary Lalbaug Parel Movie : लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन असलेला 'लालबाग परळ' हा चित्रपट चांगलाच गाजला. मुंबईतील मिल कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाने अभिनेता अंकुश चौधरीला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. पण आता एका मुलाखतीत अंकुशने महेश मांजरेकरांना हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता, असा खुलासा केला.
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते. अंकुशने 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'चेकमेट', 'दुनियादारी', 'दगडी चाळ' असा अनेक चित्रपटात काम केले. या चित्रपटांमुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. आता सध्या तो स्टार प्रवाहच्या ‘सुपरस्टार जोडी नंबर १’ या कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने त्याने एका रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. यावेळी अंकुशने पहिली शिवी आणि आईचा मार याबद्दलचा किस्सा सांगितला.
"मी पुन्हा कधीच शिवी दिली नाही"
“मला पहिल्यापासून माझ्या आईने खूप जास्त सांभाळून घेतलं. मी आतापर्यंत कोणतीही शिवी दिलेली नाही. माझी आई ही याचे सगळ्यात मोठं कारण आहे. तिने मला या सर्वच उत्तम गोष्टी शिकवल्या आणि उत्तम संस्कारही दिले. एकदा लहान असताना मी एका दारु प्यायलेल्या माणसाला बेवXX म्हणाला होतो. तेव्हा सर्वच लहान मुलं ते बोलायचे. माझ्या आईने ते ऐकलं आणि तिने मला खूप मारलं होतं. हा वाईट, अपशब्द आहे. कोणालाही अशा पद्धतीने कधीच हाक मारायची नाही, असे तिने मला सांगितलं. त्या दिवसापासून आतापर्यंत मी पुन्हा कधीच शिवी दिली नाही. असे अंकुश चौधरीने म्हटले.
"शिवी होती म्हणून मी पहिले व्यावसायिक नाटक नाकारले"
मला पहिल्या व्यावसायिक नाटकाची ऑफर मिळाली तेव्हा त्यात शिवी होती, म्हणून मी ते नाकारले होते. महेश मांजरेकरांनी मला 'लालबाग परळ' चित्रपटाबद्दल विचारले, तेव्हा त्यात खूप शिव्या होत्या. त्यामुळे मी त्यांना हा चित्रपट करु शकत नाही, असे सांगितले होते. या चित्रपटात खूप शिव्या आहेत आणि त्या देणं गरजेचे आहे. चित्रपटाच्या कथानकाची ती गरज आहे. त्यामुळे मला हा चित्रपट करता येणार नाही, असे अंकुशने महेश मांजरेकरांना म्हटले होते. त्यावर महेश मांजरेकरांनी तू एकही शिवी देऊ नकोस, मी सांभाळून घेतो, असे सांगितले होते. त्यासोबतच दुनियादारी चित्रपटातही शिवी आहे. पण त्या शिवीला एक पर्यायी शब्द दिला होता. त्यामुळे मला याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईला द्यायचं आहे. कारण तिच्यामुळे मी खूप काही शिकलो, असे अंकुश चौधरी म्हणाला.
दरम्यान 'लालबाग परळ' हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शशांक शिंदे, सीमा विश्वास, अंकुश चौधरी, अनुषा दांडेकर, सिद्धार्थ जाधव, सचिन खेडेकर आणि समीर धर्माधिकारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात मिल कामगारांचा संप, मिल मालकांची अरेरावी, मिल कामगार राहत असलेल्या चाळीतील जीवन याचे वास्तव दाखवण्यात आले होते.