बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चमकिला' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक अमरसिंग चमकिला (Singh Chamkila) यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. दिलजीत आणि परिणीती चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली असून, चित्रपटाने इम्तियाज अली यांच्या नावावर आणखी एका हिट चित्रपटाची नोंद केली आहे. त्यांचे मागील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध पंजाबी संगीतकार अमरसिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 1988 मध्ये चमकिला यांच्यासह त्यांची दुसरी पत्नी अमरजोत आणि बँडच्या दोन सदस्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तपास बंद केल्याने या हत्येचा उलगडा झालाच नाही. 


इम्तियाज यांनी या चित्रपटावर बोलताना सांगितलं आहे की, "मी बायोपिक करेन असा विचार केला नव्हता. पण चमकीलाच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी होत्या ज्या प्रेक्षकांना माहिती नव्हत्या. पण जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यावर चित्रपट करता तेव्हा तथ्य बदलायचं नाही आणि सर्व बाजू मांडणं गरजेचं असतं. जर तुम्ही त्यांनी केलेल्या चुका दाखवल्या नाही तर मग उगाच उदोउदो करण्याचा अर्थ काय? मला ते बायोपिक आवडत नाहीत ज्यात ते ज्या व्यक्तीवर आधारित आहेत त्याचा सतत गौरव करतात. ते फार कंटाळवाणे ठरतात".


"चमकिलाला प्रेक्षकांकडून दोन वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत होत्या. मला असं वाटलं की आपण चमकिलाची मानवी बाजू मांडायला हवी. तो अगदी चांगला आणि सभ्य दाखवावा असा माझा प्रयत्न नव्हता. तो तसा नव्हता. याचं कारण मला त्याच्यातील काही आंतरिक चांगले गुण माहीत होते. मला त्यांच्याबद्दल खूप खात्री होती. तो एक स्टार म्हणून नाही, तर जनतेचा सेवक म्हणून समोर आला. तो अत्यंत वंचित पार्श्वभूमीतून येणारा अत्यंत नम्र माणूस आहे. त्याने कधीच नखरे केले नाहीत. कोणीही त्याला जे काही करायला सांगितले ते त्याने नेहमी मान्य केले. आणि त्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला कारण तो प्रेक्षकांना नाही म्हणू शकला नाही. तो तसा माणूस होता आणि आम्ही त्याला समजू शकतो. त्याच्यातही त्रुटी होत्या,” असं इम्तियाज अली यांनी सांगितलं. 


इम्तियाज अली यांनी यावेळी चित्रपटात चमकिलाच्या त्रुटी दाखवण्याचं महत्वही सांगितलं. जर त्रुटी दाखवल्या नसत्या तर संदर्भहीन झालं असतं असंही ते म्हणाले. "असं झालं असतं तर आपण त्याच्याशा जोडलो गेलो नसतो. कधीकधी एखाद्या पात्रातील त्रुटी आणि अनियमितता प्रेक्षकांना आवडते. मग त्यांना कळते की हा माणूस माणूस आहे, अशा प्रकारे त्यांना त्यांच्याशी जोडणं सोपं जातं," असं ते म्हणाले.