मुंबई :  साधारण दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एका गाण्याच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनय विश्वात एक नवा चेहरा सर्वांच्या भेटीला आला होता. निमित्त होतं ते म्हणजे एका गाण्यातील अवघ्या काही सेकंदांसाठी दिसलेल्या तिच्या सौंदर्याचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माणिक्य मलरया पूर्वी' या गाण्याची अवघ्या काही सेकंदांची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यामध्ये अभिनेत्री प्रिया वारियर ही तिच्या नजरेने साऱ्यांना घायाळ करताना दिसली. प्रियाच्या नजरेचा बाण असा काही चालला, की पाहता पाहता तिच्या सौंदर्याने घायाळ होणाऱ्यांचा आकडा झपाट्यानं वाढला. 


सोशल मीडिया अकाऊंटवर हा वाढता आकडा भल्याभल्यांना मागे टाकणारा होता. लोकप्रियता, प्रसिद्धी, चित्रपट विश्वामध्ये एक वेगळं स्थान असं सारंकाही सुरळीत सुरु असताना रविवारी मात्र प्रियाने तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याचं वृत्त समोर आलं आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


कोट्यवधींच्या चाहत्यांचं प्रेम मिळत असतानाही प्रियानं हा निर्णय का घेतला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. मुख्य म्हणजे फक्त 'ओरु अदार लव्ह' मधील एका गाण्यामुळेट नव्हे, तर त्यानंतरही प्रिया सातत्याने चर्चेचा विषय ठरली होती, ती म्हणजे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळं. तिच्या प्रत्येक पोस्टवर लाखो लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होत होता, त्यामुळे आता तिचं या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात नसणं हे अनेकांसाठी निराशाजनक असेल असंच म्हणावं लागेल. 


 


सूत्रांच्या माहितीनुसार सोशल मीडिया ट्रोलिंगमुळं प्रियाने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात तिचा हा निर्णय कायमस्वरुपी नसेल हेसुद्धा तितकंच खरं. असं असलं तरीही, प्रिया दुसऱ्या एका माध्मातून तिच्या अदांनी अनेकांनाच घायाळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच तिनं TikTok या ऍपवर पदार्पण करत एका नव्या विश्वात पाऊल ठेवलं आहे. तेव्हा आता त्या विश्वात प्रियाला चाहत्यांचं किती प्रेम मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.