इच्छा तिथे मार्ग- शरद पोंक्षे
कर्करोगावर मात केल्यानंतर `अग्निहोत्री २` मालिकेतून पुनरागमन
मुंबई : मराठी अभिनेते शरद पोंक्षे आपल्या गंभीर आजारावर मात करत छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'अग्निहोत्री २' मालिकेच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. मालिकेत ते महादेव हे पात्र साकारताना दिसणार आहे. गेले अनेक दिवस ते त्यांच्या कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे अभिनयापासून दूर होते. त्याचप्रमाणे 'अग्निहोत्री २' मालिकेतील त्यांचं महादेव हे पात्र त्यांच्या अत्यंत जवळचं आहे. त्यामुळे ‘अग्निहोत्र २’ साठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा त्यांनी तातडीने होकार कळवला.
'इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते खरंच आहे. तुमची इच्छाशक्ती दांडगी असायला हवी. सकारात्मक रहायला पाहिजे असं मला वाटतं. पहिल्या दिवशी जेव्हा शूटिंगला गेलो तेव्हा वाटलं नव्हतं मी इतके तास शूटिंग करु शकेन. पण कुठेही थकवा जाणवला नाही. मुळात अभिनय हे नटाचं टॉनिक आहे. ते मिळालं की आपोआपच नवी ऊर्जा संचारते.' असं वक्तव्य त्यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत केलं आहे.
'अग्निहोत्र २' मालिकेची कथा नव्या पिढी भोवती फिरताना दिसत आहे. जर तुम्ही 'अग्निहोत्र' मालिकेचा पहिला भाग पाहिला नसेल तरी काही हरकत नाही. या भागात वाड्याच्या अस्तित्वाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. नव्या पीढीची नवी गोष्ट असल्यामुळे काही नवे कलाकार आहेतच मात्र जूने कलाकार देखील कथानकात झळकणार आहेत.
२००८ च्या नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित झालेली 'अग्निहोत्र' ही मालिका तब्बल १० वर्षांनी 'अग्निहोत्र २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढ्या प्रत्येकाला गूढत्वाकडे घेऊन गेल्या. या मालिकेने एक इतिहास रचला आहे आणि आता पुन्हा एकदा नवा इतिहास रचण्यासाठी ही मालिका रुपेरी पडद्यावर येत आहे.