`तुझी काय लायकी आहे`, इस्रायलवरुन ट्रोल करणाऱ्याला जावेद अख्तर यांनी दिलं सडेतोड उत्तर
बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी इस्रायलच्या विरोधात पोस्ट टाकली असता एका सोशल मीडिया युजरने त्यांना ट्रोल केलं. यानंतर जावेद अख्तर यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. गाझामधील असहाय्य नागरिकांवर सतत बॉम्बचा वर्षाव करण्याचा जावेद अख्तर यांनी विरोध केला असून, एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. पण यावरुन काही युजर्सनी त्यांच्यावर टीका केली आहे. इस्रायलवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही काही पोस्ट का केली नव्हती? अशी विचारणा काही युजर्सनी त्यांना केली आहे. तसंच काहींनी त्यांना गरजू लोकांसाठी तुमचं योगदान काय आहे? अशी विचारणाही केली आहे. दरम्यान जावेद अख्तर यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
जावेद अख्तर यांची इस्रायलवर टीका
जावेद अख्तर यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की, "म्हणजे आता इस्रायल हिरोशिमा आणि नागासाकीचं उदाहरणे देत गाझामधील असहाय्य नागरिकांवर 24 तास बॉम्बफेक करत आहे. !!! .. आणि तथाकथित सुसंस्कृत जग हे सर्व पाहत आणि ऐकत आहे. आपल्याला मानवी हक्क शिकवणारे हेच ते ते लोक आहेत".
गाझाचं समर्थन केल्याने टीका
जावेद अख्तर यांच्या पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, "ज्याप्रमाणे चित्रित केलं जात आहे, त्याप्रमाणे ते निष्पाप नागरिक नाहीत. ते रक्तरंजित दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार आणि त्यांना आश्रय देणारे आहेत ही वस्तुस्थिती आहे".
जावेद अख्तर यांनी टीकेला दिलं उत्तर
जावेद अख्तर यांनी या टीकेलाही उत्तर दिलं आहे. आपण प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. "मी नेहमीच झुंड, बॉम्ब, राज्य अशा सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आहे. पण अविनाश तुला माझं म्हणणं कळणार नाही कारण तू धर्मांध बनून आपली ओळख शोधू पाहणारा एक व्यर्थ आहे," अशा शब्दांत जावेद अख्तर यांनी सुनावलं.
पण जावेद अख्तर यांचं हे उत्तर अनेक युजर्सना आवडलं नसून, त्यांना ट्रोल केलं आहे. काहींनी त्यांना ढोंगी म्हटलं आहे. यामधील एकाने तुम्ही फक्त आपण लिहिलेली गाणी विकली आहेत, याशिवाय तुमची काही ओळख नसल्याचं म्हटलं आहे. गरजूंच्या विकासासाठी तुम्ही काहीच काम केलेलं नाही असंही त्याने सुनावलं. तर एका युजरने लिहिलं आहे की, सर्वात मोठे ढोंगी तर तुम्हीच आहात. दहशतवादाला समर्थन करत नाही, पण दहशतवाद्यांचं समर्थन करणाऱ्या नागरिकांना पाठिंबा देता.
जावेद अख्तर हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक मुद्द्यांवर ते परखडपणे आपलं मत मांडत असतात. काही वेळा त्याचं कौतुक होत असतं, तर काही वेळा त्यांना टीकेचा सामना करावा लागतो.
7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 1400 नागरिक ठार झाले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी एका म्युझिक फेस्टिव्हलमध्ये घुसखोरी करत 260 जणांना ठार केलं होतं.