जयललितांचा बायोपिक प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांच्या भाचीने दर्शवली हरकत
मुंबई : नेहमी वादाचं मुकुट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगणा रानौतचा आगामी 'थलायवी' चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'थलायवी' चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्या यशोगाथेवर आधारलेला आहे. जयललीता यांची भाची दीपाने मद्रास उच्च न्यायालयाकडे चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एल. विजययांनी आपला सल्ला घेतला नसल्याचे दीपाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काही घटनांना योग्य प्रकारे न मांडता जयललिता यांची यशोगाथा चुकीच्या पद्धीत मांडण्यात आल्याची शक्यता दीपा यांनी व्यक्त केली आहे.
तर, कंगणा तिच्या या आगामी चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. शिवाय कंगणा 'भरतनाट्यम' या शास्त्रीय नृत्यशैलीचे धडे देखील गिरवत आहे. त्याचप्रमाणे ती चित्रपटाच्या तयारीससाठी अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये काम करत आहे.
चित्रपटात अरविंद स्वामी एमजीआर यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटात प्रकाश राज देखील भूमिका साकारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.