नवी दिल्ली : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार कपल काजोल (Kajol) आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांची 'तान्हाजी' सिनेमाच्या निमित्तानं चर्चा जोरावर आहे. दोघंही सध्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशा वेळी काजोलनं आपल्या खऱ्या आयुष्यातील एक दुखरी घटना पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांशी शेअर केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या इन्स्टाग्राम पेजशी संवाद साधताना काजोलनं आपल्या आयुष्यातील काही खासगी गोष्टी उघड केल्यात. यामध्ये आपली आणि अजयची पहिली भेट कशी होती हे सांगतानाच 'कभी खुशी कभी गम' दरम्यान आपला गर्भपात झाल्याचा खुलासा काजोलनं केलाय. ज्या दिवशी 'कभी खुशी कभी गम'नं बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली त्यावेळी गर्भपातामुळे ती रुग्णालयात होती, असं काजोलनं म्हटलंय.


दोन वेळा झाला काजोलचा गर्भपात


'लग्नानंतर आम्ही आई-वडील बनण्याचा निर्णय घेतला. २००१ साली 'कभी खुशी कभी गम' दरम्यान गर्भवती होते. परंतु, गर्भपात झाला. ज्या दिवशी सिनेमा थिएटरवर चांगली कमाई करत होता त्याच दिवशी मी रुग्णालयात होते... आणि माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण अजिबात नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा मला गर्भपाताला सामोरं जावं लागलं. परंतु, नंतर स्थिती सामान्य झाली आणि न्यासा - युगनं आमचं कुटुंब पूर्ण केलं' हे सांगताना काजोल भावूक झाली.


अजय-काजोलची पहिली भेट


याच मुलाखतीत बोलताना काजोलनं पती अजयशी पहिली भेट झाल्याची आठवणही सांगितली. '२५ वर्षांपूर्वी आम्ही हलचल सिनेमाच्या सेटवर भेटलो होते. मी शूटसाठी तयार होते आणि माझा हिरो कुठेय? म्हणून चौकशी करत होते. तर कुणीतरी अजयकडे बोट दाखवलं. तो एका कोपऱ्यात बसला होता. अजयला भेटण्याच्या १० मिनिटे अगोदर मी त्याच्याबद्दल वाईट बोलत होते. त्यानंतर मात्र आम्ही सेटवर बोलणं सुरू केलं आणि आम्ही चांगले मित्र बनलो'


आमच्या दोघांची भेट झाली तेव्हा आम्ही दोघेही दुसऱ्याच व्यक्तींना डेट करत होतो. परंतु, काही काळाने दोघांचाही आपापल्या पार्टनरसोबत ब्रेकअप झाला आणि अजय-काजोल जवळ येत गेले. दोघांनीही दीर्घकाळापर्यंत एकमेकांना प्रपोज केलं नाही परंतु, हे आपलं एकमेकांवर प्रेम असल्याचं दोघांनाही न बोलताच कळून चुकलं होतं, असाही खुलासा काजोलनं केलाय.