मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशाच्या राष्ट्रपती पदी आता कोण बसणार अशा चर्चा सुरु होत्या. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत होती. पण आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. पण अखेर द्रौपदी मुर्मू या बहुमत सिद्ध करत राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सगळ्या क्षेत्रातून शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव होताना दिसतोय.  पण सगळ्यांचे लक्ष हे बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'नारी शक्तीचा विजय असो' असे तिने कॅप्शन दिले आहे.  'आदिवासी समाजातून आलेली एक महिला देशातील सर्वोच्चपदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होते ही मोठी बाब आहे, या शिवाय त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत,' असं कंगना पुढे म्हणाली. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.



 


राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) द्रौपदी मुर्मू यांनी ६,७६,८०३ इतके मतमूल्य मिळवून विजय मिळवला.  विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या पारड्यात केवळ ३,८०,१७७ इतके मतमूल्य जमा झाले. द्रौपदी मुर्मू या ओडिसातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. 


द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओडीसाच्या रायरंगपुर मधून 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे त्याच मतदारसंघातून त्या आमदार झाल्या आणि आता आदिवासी समाजातील राष्ट्रपती झालेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती बनणार आहेत.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत असून, २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.


द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओदिशातील मयूरभंज येथे झाला. त्यांचे वडील, बिरांची नारायण तुडू हे बाईदापोसी गावातील अल्पभूधारक शेतकरी. अत्यंत गरिबीतही त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. त्या रायरंगपूरमध्ये ‘अरिबदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च’ या संस्थेत प्राध्यापक झाल्या. त्यानंतर त्यांची ओदिशाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली.