मुंबईला POK म्हणणारी कंगना पुन्हा चवताळली, टीका करणाऱ्यांवर पलटवार
तिने ट्विटच्या शेवटी #ShameOnSanjayRaut हा हॅशटॅग वापरला आहे.
मुंबई: मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर सध्या सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर कंगना राणौत हिने आणखी एक ट्विट करून विरोधकांवर पलटवार केला आहे. या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, तर आता सगळ्या गुंडांची तळपायाची आग मस्तकात केली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत पण त्यांच्याकडे मांडायला कोणताही तर्कशुद्ध मुद्दा नाही. त्यामुळे हे सर्वजण माझ्याविषयी आक्षेपार्ह मिम्स तयार करत असून मला नावं ठेवत आहेत. तसेच #KanganaPagalHai असा हॅशटॅग चालवत आहेत. या ट्विटमध्ये कंगनाने संजय राऊतांचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, तिने ट्विटच्या शेवटी #ShameOnSanjayRaut हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कंगना, मुंबईने कित्येकांना डोक्यावर घेतले अन् पायदळीही तुडवले...
तत्पूर्वी कंगनाच्या मुंबईविषयीच्या वक्तव्यावर अनेक मराठी सेलिब्रिटींनी निषेध नोंदवला. 'या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus, असे ट्विट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले. तर अभिनेता रितेश देशमुख यानेही कंगना राणौतला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे आता वाद चांगलाच तापण्याची शक्यता आहे.
कंगना म्हणजे झाशीची राणी; शिवसेना नेत्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही- राम कदम
काय आहे वाद?
कंगनाने गुरुवारी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंबई शहराविषयी टिप्पणी केली होती. तिने म्हटले होते की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला होता.