मुव्ही माफीया गुंडापेक्षा मला पोलिसांची जास्त भीती वाटते, कंगनाचा आरोप
मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते असा खळबळजनक आरोप
मुंबई : मुव्ही माफीया गुंडापेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते असा खळबळजनक आरोप अभिनेत्री कंगना राणौतने ट्वीटरवरुन केलाय. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या. पण मुंबई पोलिसांकडून नको असे तिने ट्विटरवर म्हटलंय. भाजप नेते राम कदम यांच्या ट्वीटला रिट्विट करत तिने हा आरोप केलाय.
कंगना बॉलिवुडमधील ड्रग्ज माफीयांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे. पण तिला पोलीस सुरक्षा हवीय. १०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी कंगनाला सुरक्षा मिळत नाहीय, असे ट्वीट भाजप नेते राम कदम यांनी केलंय. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना टॅग केलंय. या ट्वीटला कंगनाने रिट्वीट केला आणि मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरु असणाऱ्या तपासादरम्यान आता अंमली पदार्थ अर्थातच ड्रग्जचा वापर झाल्याची बाब समोर येत आहे. यामध्येच इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा कशा प्रकारे वापर केला जातो याचा गौप्यस्फोट कंगनानं केला.
सोशल मीडियाचा आधार घेत कंगनानं तिच्याच आयुष्याशी संबंधित एक घटना सांगितली. ज्यामुळं अनेकांना धक्काच बसत आहे. शिवाय बी- टाऊनमधील एका गटावकरही तिनं टीका केली आहे. नार्कोटीक्स टेस्ट झाल्यास अनेक कलाकार जेलमध्ये जातील असा खळबळजनक दावाही तिनं केला.
लास वेगसमधील प्रसंगाबाबत सांगत कंगना म्हणाली, 'त्यावेळी त्याची परदेशी प्रेयसी त्याच्यासोबतच असायची. दररोज रात्री तिथं पार्टी व्हायची. ड्रग्ज तर पाण्यासारखे वाहायचे. एलएसडी, कोकेन, ecstasy pills अशा प्रकारचे अंमली पदार्थ ते दिवसाही घ्यायचे'. इतकंच नव्हे तर, नाव न घेता ज्या अभिनेत्याबाबत तिनं हे धक्कादायक खुलासे केले त्याला अती प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळं कोकिलाबेन रुग्णालयात दाखलही करण्यात आल्याचं ती म्हणाली.
'त्याच्या फुफ्फुसावर याचा परिणाम झाला होता. माझ्या मते रुग्णालयानं ही बातमी बाहेर येऊच दिली नाही. हे प्रकरण तिथल्या तिथे मिटवण्यात आलं', असा खळबळजनक खुलासा तिनं केला. ज्यामुळं आता कंगनाला त्या अभिनेत्यानंच पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिल्याचंही ती म्हणाली. मला या सर्व गोष्टी माहित होत्या, असं म्हणत जवळपास ९९ टक्के कलाविश्वात ड्रग्जचा सर्रास वापर होतो ही बाब तिनं समोर ठेवली. याच धर्तीवर आपल्यावर काही मंडळींकडून सातत्यानं आरोपही केले जात असल्याचं स्पष्टीकरण तिनं दिलं.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये असणारी गटबाजी आणि घराणेशाही पुन्हा डोकं वर काढू लागली. ज्यामध्ये कंगना आणि इतर काही कलाकारांनी घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवत बी- टाऊनमधील प्रस्थापितांना निशाण्यावर घेतलं.