`सीडीआर` प्रकरणात कंगनाचं नाव आल्यानंतर बहिणीनं दिलं प्रत्यूत्तर
सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) प्रकरणात वकील असलेल्या रिझवान सिद्दीकीला अटक झाल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यानंतर या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी, जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ आणि अभिनेत्री कंगना रानौत यांचीही नावं जोडली गेली.
मुंबई : सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) प्रकरणात वकील असलेल्या रिझवान सिद्दीकीला अटक झाल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या. त्यानंतर या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी, जॅकी श्रॉफची पत्नी आएशा श्रॉफ आणि अभिनेत्री कंगना रानौत यांचीही नावं जोडली गेली.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता ऋतिक रोशनविरुद्ध कायदेशीर लढाई लढणाऱ्या कंगनानं तिच्या वकिलाला अर्थात रिजवान सिद्दीकीला २०१६ साली ऋतिकचा फोन नंबर दिला होता. त्यामुळे, या प्रकरणात कंगनावर अनेक आरोप होत आहेत.
कंगनानं हा मोबाईल क्रमांक रिजवान सिद्दीकीला का दिला? रिजवाननं ऋतिकचे फोन डिटेल्स चोरले का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. रिजवान सिद्दीकी सध्या बेकायदेशीररित्या सेलिब्रिटिजचे कॉल डिटेल्स काढण्याच्या प्रकरणात फसलाय.
पण, कंगनावर होत असलेल्या आरोपांना नेहमीप्रमाणेच तिची बहिण रंगोली चंडेलनं उत्तर दिलंय. 'जेव्हा आपण एखाद्या नोटिशीला उत्तर देतो, तेव्हा वकिलाला आपण वेगवेगळी माहिती देतो. वापर कायद्याचं उल्लंघन करण्यासाठीच ही माहिती देण्यात आली होती, अशी केवळ कल्पना करून त्यावर वक्तव्य करणं आणि एखाद्या कलाकाराची छबी खराब करणं चुकीचं आहे. एखादी गोष्टीवर बोलण्यापूर्वी त्याची चौकशी करणं आवश्यक आहे' असं ट्विट रंगोलीनं केलंय.