मुंबई : बॉलिवूड क्विन कंगणा रनौत तिच्या नुकत्यास प्रदर्शित झालेल्या 'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झांसी' मधील तिची उत्तम भूमिका आणि चित्रपटामुळे झालेल्या वादामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'मणिकर्णिका' चित्रपटाचे दिग्ददर्शन कृष करत होते. त्यानंतर त्यांनी चित्रपट मध्येच सोडून दिल्याने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा कंगणाने स्वत: सांभाळली. 'मणिकर्णिका'च्या दिग्दर्शनानंतर आता कंगणा स्वत:चा बायोपिक दिग्दर्शित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तनुसार, कंगणा स्वत:चे जीवन मोठ्या पडद्यावर दाखवू इच्छिते. 'बाहुबली'चे लेखक केवी विजेंद्र प्रसाद या बायोपिकचे लेखन करणार असून कंगणा चित्रपटासाठी दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन कंगणाचे आगामी 'पगा' आणि 'मंटल है क्या' या चित्रपटांनंतर सुरू होणार आहे. 


कंगणाच्या बायोपिकची माहिती समोर आल्यानंतर अनेकांनी रितिक रोशन आणि करण जौहर यांच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अनेकांनी या बायोपिकमध्ये रितिक रोशन आणि करण जौहरच्याही भूमिका असणार का? असा सवाल केला आहे. त्यावर उत्तर देताना कंगणाने सांगितलं की, 'हा, हे खरं आहे की माझ्या जीवनावर आधारित चित्रपटाचं मी दिग्दर्शन करणार आहे. परंतु चित्रपटात कोणत्याही भूमिकेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट शेडमध्ये दाखवण्याचा माझा उद्देश नाही. त्याऐवजी चित्रपटात माझ्या आयुष्यातील काही खास, महत्त्वाच्या क्षणांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे माझ्यावर मला जज न करता प्रेम करतात. हा चित्रपटात माझ्या आयुष्यातील चढ-उतारावर आधारित असल्याचं' तिनं सांगितलं. 


'मणिकर्णिका: द क्विन ऑफ झांसी' त्याच्या दिग्दर्शनामुळे मोठ्या वादात होता. हा चित्रपट दिग्दर्शक कृष यांनी अर्ध्यावरच सोडून दिल्यामुळे चित्रपटाचे पुढील दिग्दर्शन कंगणाने स्वत: सांभाळले. कृष यांनी कंगणावर मनमानी केल्याचा आरोप केला होता. चित्रपटातील दिग्दर्शनासाठी क्रेडिट्स न देण्यासही कंगणाने विरोध केल्याचं कृष यांनी सांगितलं होतं. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट मोठ्या वादात अडकला होता. परंतु प्रदर्शनानंतर चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली असून प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला पसंती दर्शवण्यात आली.