बंगळुरू : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या अकाली एक्झिटमधून कलाविश्व आणि चाहते सावरत नाहीत, तोच आणखी एक धक्कादायक बातमी याच कलाजगताच्या दारी येऊन धडकली आहे. मालिका विश्वात लोकप्रिय असणाऱ्या एका अभिनेत्यानं गळफास लावून आयुष्य संपल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्नड कलाजगतामध्ये मालिका विश्वात नावारुपास आलेल्या अभिनेता सुशील गौडा यानं गळफास लावून जीवनाचा अंत केला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कर्नाटकातील मंड्या येथे असणाऱ्या राहत्या घरी सुशीलनं आत्महत्या केली. त्यानं उचललेलं हे पाऊल मित्रपरिवार आणि त्याच्या कुटुंबाला हादरा देऊन गेलं आहे. 


'अंतपुरा' या मालिकेतील भूमिकेमुळं सुशील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मंगळवारीच त्यानं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. 'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार अभिनयाव्यतिरिक्त तो फिटनेस ट्रेनिंग आणि मॉडेलिंगमध्येही सक्रिय होता. त्याशिवाय कन्नड चित्रपट जगतामध्येही तो आपलं स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नांत होता. 'सलगा' या आगामी चित्रपटातून तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. 



 


कन्नड सेलिब्रिटी विश्वातून काही दिवसांपूर्वीच अभिनेता चिरंजीवी सारजाच्या निधनाचं वृत्त आलं होतं. या शोकसागरातून हे दाक्षिणात्य कलाविश्व सावरत नाही, तोच आता सुशील गौडा याच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा दु:खाची लाट आल्याचं पाहायला मिळत आहे.