मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक नव्या चर्चांना उधाण आले आहे. पोलीस देखील याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमधील घराणेशाहीवरून अनेक वाद निर्माण होत आहेत. सोशल मीडियावर सलमान खान, करण जोहर, एकता कपूर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे दिग्दर्शक करण जोहर चांगलाच त्रासला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियापासून देखील दूर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणने ट्विटरवर अनेकांना अनफॉलो देखील केलं आहे. सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे आणि कोणाचाच पाठिंबा नसल्यामुळे त्याने MAMI (मुंबई फिल्म फेस्टिव्हल) च्या बोर्डवरून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरने MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवरून राजीनामा दिला आहे.


मुंबई फिल्म फेस्टिव्हल  संचालिका स्मृती इराणी यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे समजत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण या फिल्म फेस्टिव्हलची अध्यक्षा आहे. करणने त्याने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचाही दीपिकाने सल्ला दिला. मात्र करण त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं समोर येत आहे.


दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी किड्सच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर अभिनेत्री कंगना रानौत सारख्या बाहेरून आलेल्या आणि बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या कलाकारांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.