कर्नाड यांचा `हा` अखेरचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
तब्बल ३३ वर्षांनंतर त्यांनी `सरगम` चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पुनर्पदार्पण केले होते.
मुंबई : नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. बंगळुरूतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य आणि कला क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. तब्बल ३३ वर्षांनंतर त्यांनी 'सरगम' चित्रपटाच्या माध्यमातून मराठी कलाविश्वात पुनर्पदार्पण केले होते. पण सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'सरगम' चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आहे.
सेन्सॉर बोर्डाने 'सरगम' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटात वापरण्यात आलेल्या 'आदिवासी' शब्दावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. 'आदिवासी' शब्दा ऐवजी 'वनवासी' शब्द वापरा असा सल्ला सेन्सॉरच्या परिक्षकांनी निर्मात्यांना दिला आहे.
'सरगम' चित्रपटाची कथा १६ ते १७ वर्षांच्या तरुण-तरुणीची प्रेमकथा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या शिवाय 'सरगम' चित्रपटात ऋत्विक केंद्रे, दिशा परदेशी, यतीन कार्येकर, राजलक्ष्मी, संजय परदेशी, डॉ. सुधीर निकम हे दिग्गज कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहेत.
कर्नाड यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (१९९९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर ‘इक्बाल’ (२००५) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (२००९) यासोबतच 'टायगर जिंदा है' या चित्रपटांतून ते झळकले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. ज्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट 'वंश वृक्ष' (१९७२), 'काडू' (१९७४), 'ओन्दानुंडू कालाडल्ली' (१९७८) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (१९८०) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला होता.