मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे हे 14 वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. यंदाच्या एपिसोडमध्ये काही खास लोकांनी शोमध्ये हजेरी लावली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कौन बनेगा करोडपती’ चा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं असल्याचे दिसत आहे. या व्हारल होत असलेल्या प्रोमोत काही आजी आपल्याला दिसत आहेत. या आजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेल्या फांगणे गावामध्ये कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्टतर्फे आजीबाई शाळा भरवली जाते, त्या शाळेत त्या जातात. या गावामधील ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक असलेल्या महिलांना अक्षर ओळख करून त्यांना साक्षर करण्याचं काम केलं जातं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या या शाळेत ६० ते ९४ वयाच्या ३० आजी आपल्या उतारवयात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, हे वाक्य इथं खरं ठरतं आहे. या सगळ्यांची शिक्षण घेण्यासाठी असलेली जिद्द, त्यासाठी घेत असलेले कष्ट यांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या शाळेची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या शाळेसाठी दिलीप दलाल, शिक्षिका शीतल मोरे या मेहनत घेत आहेत. तसंच याची दखल 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमातून खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील घेतली आहे.


17 ऑगस्ट रोजी कार्यक्रमात गुलाबी नऊवारी साडी नेसलेल्या डोक्यावरचा पदर सांभाळत असलेल्या आज्ज्या उत्साहानं प्रेक्षकांनमध्ये बसल्या आहेत. यावेळी अमिताभ या सगळ्या आज्ज्यांचं खूप कौतुक करत असल्याचे दिसते. यावेळी अमिताभ म्हणाले की,' या सगळ्या अशा आहेत की त्यांना लहानपणी शिकण्याची संधी मिळाली नाही. परंतु वयाच्या या टप्प्यावर आल्यावर देखील त्यांच्यातील शिकण्याची उर्मी तसूभरही कमी झाली नाही. जिद्दीनं या सगळ्या शिकत आहेत आणि जगाला दाखवणून देत आहेत की शिक्षण जरूरी नाही तर ते अत्यंत आवश्यक आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या सगळ्यांचं स्वागत करुया.'


दरम्यान, कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्या आज्ज्यांना फक्त अक्षर ओळख नाही तर त्यांना स्वतःचं नाव देखील लिहिता येतं. त्या सगळ्या आज्ज्यांनी पाटीवर त्यांचं नाव लिहिता येतं असं योगेंद्र बांगर यांनी अमिताभ यांना सांगितलं. ते ऐकल्यानंतर बच्चन यांनी या सर्वांना नाव लिहून दाखवण्याची विनंती केल्यानंतर सगळ्या आज्ज्यांनी अतिशय उत्साहानं स्वतःचं नाव पाटीवर लिहिलं. ते पाहून अमिताभ देखील खूप भावुक झाले आणि त्यांनी या सर्व आजींच्या जिद्दीला सलाम केला.