Kedar Shinde on The Kerala Story: 'जय जय महाराष्ट्र माझा'सारख्या गीतातून महाराष्ट्राची गाथा घराघरात पोहचवणाचे शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा चित्रपट मोठ्या धुमधड्यात 28 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झालाय. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सना केदार शिंदे व अश्विनी महांगडेही या अभिनेत्रींनी महाराष्ट्र शाहीर चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण साकारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटाने काहीच दिवसांत कोटींचा गल्ला कमावला आहे. पण मराठी चित्रपट सोडून हिंदी चित्रपट (Hindi Movie) मोफत दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांवर दिग्दर्शक केदार शिंदे चांगलेच भडकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात सध्या द केरला स्टोरी या चित्रपटाचीसुद्धा जोरदार चर्चा सुरुय. केरळमध्ये सुरु असलेले हिंदू मुलींचे धर्मातरण, दहशतवादी संघटनांमध्ये भरती यासारख्या मुद्द्यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे देशभरात या चित्रपटाबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. काश्मिर फाईलप्रमाणेच हा चित्रपटही लोकांनी डोक्यावर उचलून घेतला आहे. जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय नेते हा चित्रपट मोफत दाखत आहेत. महाराष्ट्रातही काही ठिकाणी या अशा प्रकारच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे.  यावरुनच केदार शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.


केदार शिंदे यांनी ट्विट करुन महाराष्ट्रातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. "दुर्दैव... महाराष्ट्रात "केरला स्टोरी" या सिनेमाचे खास शो आपले महाराष्ट्रातले नेते प्रायोजित करून लोकांना मोफत दाखवतायत. या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शाहीर" प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का?" असा सवाल केदार शिंदे यांनी ट्विट करुन विचारला आहे.



दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’च्या चित्रपटाच्या टीझरपासूनच वाद सुरु झाला होता. सेन्सॉर बोर्डाने बदल सुचवल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये एका हिंदू मुलीची कथा मांडण्यात आली असून फसवणूक करत तिचे धर्मांतरण करण्यात करण्यात येते. त्यानंतर या मुलीला आयएसआयएस या दहशवादी संघटनेत भरती करण्यात येते. यानंतर त्या मुलीच्या घरवापसीची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. लव्ह जिहाद, दुसऱ्या धर्माचा द्वेष, जबरदस्तीच धर्मांतरण यासारख्या मुद्द्यांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.