मुंबई : महाभारत या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेते रसिक दवे(Rasik dave) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री आठ वाजता किडनी संबंधित आजाराशी झुंज देणाऱ्या रसिक दवे यांना अखेर मृत्यूनं गाठलं. रसिक दवे हे 'क्यों की सास भी कभी बहु थी' मधील आरारारा..या संवादानं घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री केतकी दवेचे पती होते. पतीच्या मृत्यूनंतर अभिनेत्री कोलमडली आहे. पतीच्या मृत्युनंतर तिनं पहिल्यांदाच मौन सोडत म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखती दरम्यान केतकी दवे म्हणाल्या,'रसिकला कधीच कुणाला आपल्या आजाराविषयी सांगितलेलं आवडायचं नाही, म्हणून आम्ही देखील कधीच कुणाला त्याविषयी काही सांगितले नाही. त्याला आपलं आयुष्य खाजगी ठेवलेलं आवडायचं. त्याला विश्वास होता की, सगळं ठीक होईल. पण आतमध्ये कुठेतरी त्याला जाणीव झाली होती की आता काहीच ठीक होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून तो मला सारखं म्हणायचा, कायम काम करत राहिलं पाहिजे. मला एका नाटकाची तयारी करायची होती. मी त्याना म्हणाले की, सध्या मी काम करण्याच्या मनःस्थितीत नाहीये. पण तो मला म्हणाला, सतत काम करत राहायला हवं. कधीच काम करणं थांबवायचं नाही.'


केतकी दवे पुढे म्हणाल्या, 'तो जेव्हा आजारी होता, तेव्हा देखील तो म्हणायचा की, मी ठीक होईन. मी आशा सोडणार नाही. आज मी या कठीण परिस्थितीचा सामना करु शकते कारण मला माहीत आहे रसिक माझ्यासोबत कायम असणार. माझ्यासोबत माझं कुटुंब आहे, माझी मुलं, माझी आई, सासू सगळेच माझी ताकद आहेत. पण मी माझ्या पतीला खूप मिस करेन. जेव्हा आम्हाला रसिकच्या आजाराविषयी कळलं, तेव्हा मी खूप रडले होते. पण माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.'


रसिक दवे यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना केतकी दवे म्हणाल्या, 'आम्ही 1979 मध्ये भेटलो. आमच्यात चांगली मैत्री झाली. एकमेकांना आम्ही मग पसंत करू लागलो आणि 1983 मध्ये आम्ही लग्न केलं. रसिकने आयुष्य खूप मनापासून जगलं. मला नेहमीच काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. 40 वर्ष रसिकसोबत आयुष्य जगले, तेही आनंदात, कारण आयुष्य कसं जगायचं हे रसिकला माहित होतं आहे.'