`...ती मरु लागलीये,` `तो` फोन कॉल आणि काही तासात Kim Kardashian सारखी हुबेहूब दिसणाऱ्या मॉडेलचा मृत्यू
क्रिस्टीना (Christina Ashten) हिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाने 26 एप्रिलला शेअर केली आहे. अंत्यविधीसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने कुटुंबाने ही पोस्ट केली होती.
प्रसिद्ध मॉडेल आणि किम कार्दशियनसारखी (Kim Kardashian) दिसत असल्याने सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी क्रिस्टीना (Christina Ashten) हिचा मृत्यू झाला आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर काही तासातच ह्रदय बंद पडल्याने (Cardiac Arrest) तिला जीव गमवावा लागला. न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. क्रिस्टीना 34 वर्षांची होती. 26 एप्रिलला तिच्या कुटुंबाने इन्स्टाग्राम आणि GoFundMe पेजच्या माध्यमातून तिच्या मृत्यूची माहिती दिली. पुढील आठवड्यात तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.
"20 एप्रिलला पहाटे 4 वाजून 31 मिनिटांनी आम्हाला कुटुंबातील एका सदस्याकडून फोन आला होता. या कॉलमध्ये तो सदस्य ओरडत आणि रडत होता. क्रिस्टीना मरु लागली आहे असं तो वारंवार बोलत होता. ही फोन कॉलनंतर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यभर आता हा फोन कॉल आम्हाला सतावत राहील," असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
क्रिस्टीनाने सर्जरी केल्यानंतर ही वाईट वेळ आली असून ह्रदयक्रिया बंद पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. तिच्या अचानक आणि दुःखद निधनानंतर आता हत्येशी संबंधित चौकशी केली जात आहे. कारण वैद्यकीय प्रक्रिया केल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे," असा दावा कुटुंबाने केला आहे.
"आमची लाडकी मुलगी आणि बहीण क्रिस्टीना अॅश्टेन हिचे अत्यंत हादरवून टाकणारे, दुर्दैवी आणि अनपेक्षित निधन झाल्याचे दु:ख आणि अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला सांगावं लागत आहे," असं कुटुंबाने म्हटलं आहे.
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या या 34 वर्षीय मॉडेलचे इंस्टाग्रामवर 6,26,000 पेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स आहेत. किम कार्दशियनशी तिच्या आश्चर्यकारक साम्याने जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.