ऑस्ट्रेलियात BMW वर `जय भीम` नंबर प्लेट लावणारा कोण? अभिनेते किरण माने म्हणाले, `निव्वळ टँलेंटच्या बळावर...`
Kiran Mane Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
Kiran Mane Post : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता किरण माने हे त्यांच्या मालिका आणि नाटकांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. पण त्याहून जास्त चर्चा होते ती किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्टची. किरण माने हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आता किरण माने यांनी सोशल मीडियावर एक अशी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
किरण माने यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक बीएमडब्ल्यू दिसत आहे. तर त्याची ही बीएमडब्ल्यू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण त्याची नंबर प्लेट आहे. या व्यक्तीच्या गाडीला नंबर प्लेटमध्ये कोणताही नंबर नाही तर जय भीम असं लिहिलं आहे. हा फोटो शेअर करत किरण माने म्हणाले, 'जयभीम'... कसं थाटात आणि टेचात लिहिलयं नंबरप्लेटवर. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू आहे ही भावांनो ! ...मला आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर हा नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहीलीवती, 'बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो. क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघनार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हणाला, 'तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला.'
पुढे किरण माने म्हणाले, 'अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून काम कमावतोय. तिथंच स्थायिक झाला आहे. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय... ऐश्वर्यसंपन्न झालाय... पण तरी देखील आपली पाळंमुळं विसरलेला नाही. आपल्या शिक्षणाचा पाया ज्याच्यामुळे घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. आपन खातो त्या भाकरीवरच नाही, तर ब्रेड-बटर, पिझ्झा-बर्गरवरबी बाबा साहेबांचीच सही आहे याची जाणीव ठेवली आहे.'
हेही वाचा : तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'
पुढे जयभीम या नंबर प्लेटविषयी बोलत किरण माने म्हणाले, 'हे प्रेम फक्त गाडीवर 'जयभीम' लिहिण्या पुरतं नाही बरं का... आपल्यापैकी बर्याचजनांना वाटंल, त्यात काय विशेष? अनेक लोक अशी महामानवांची नावं गाडीवर लिहित्यात. म्हणून त्यापुढे जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आणि नंतर खर्या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनही अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार मुलांना हेरून, त्यांना करियर गायडन्स करनं... उच्च शिक्षनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवुन देनं, अशी कामं मनापासून आणि आनंदानं करतो हा आपला दोस्त ! शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे 'खरेखुरे' विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊ देत... कुठल्याही प्रांतात जाऊ देत... कुठल्याही देशात जाऊ देत... न डरता, न लाजता, कोणालाची चिंता न करता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवणार... हे जग सुंदर करणार ! सलाम मित्रा अमित. लव्ह यू. जय शिवराय... जय भीम !' किरण माने यांनी शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.