अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा कार अपघात झाला आहे.
मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. महामार्गावर त्यांची कार एका ट्रकला धडकली. सुदैवाने कारमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या अपघातात गाडीचं मोठ नुकसान झालं आहे. या अपघाताची माहिती किशोरी शहाणे यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिलीये. यानंतर त्यांचे चाहते देवाचे आभार मानत आहेत. गाडीची अवस्था पाहून गाडीतील प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. असं म्हटलं तर ते चूकिचं ठरणार नाही.
किशोरी शहाणे यांनी इंस्टाग्रामवर अपघातग्रस्त कारचे तीन फोटो पोस्ट केले आणि लिहिलंय की, कारचं नुकसान झालं मात्र जीव वाचला. देवाची कृपा. 'देव तारी त्याला कोण मारी'. अशा आशयाचं कॅप्शन देत किशोरी शहाणे यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. किशोरी यांच्या पोस्टवर कमेंट करत, सीरियलमध्ये शिवानीची भूमिका साकारणाऱ्या यामिनी मल्होत्राने चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस केलीये. त्याचबरोबर चाहते देखील कमेंटमध्ये काळजी करत आहेत. मात्र, कारमधील सगळेजण सुखरूप असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
किशोरी शहाणे हे टेलिव्हिजन आणि बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. किशोरी शहाणे गेल्या ३ दशकांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. किशोरी शहाणे हे मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील खूप मोठं नाव आहे. 'गम है किसी के प्यार में' या टीव्ही शोमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे भवानीची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
किशोरी शहाणे यांनी शिर्डी के साई बाबा, हफ्ता बंद, प्यार की देवता, कर्मा, बॉम्ब ब्लास्ट, मुंबई गॉडफादर, प्यार में ट्विस्ट, मिलेंगे मिलेंगे, भय, रेड: द डार्क साइड, सुपरस्टार, मोहेंजो दारो आणि यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यासोबतच अनेक मालिकेमध्येही त्यांनी काम केलं आहे.