Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Marriage : 'टाईमपास' या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून प्रथमेश परबला ओळखले जाते. प्रथमेश परबच्या लग्नाला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. उद्या 24 फेब्रुवारीला प्रथमेश परब लग्नबंधनात अडकणार आहे. प्रथमेश परब हा क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रथमेश आणि क्षितीजा यांच्या लग्नापूर्वीच्या विविध विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा हळदी सोहळा पार पडला. प्रथमेशसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी क्षितीजा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्षितीजाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. यात ती तिच्या घराबाहेर बसल्याचे दिसत आहे. तर एका फोटोत ती घराबाहेरील मांडवात उभी राहून घराकडे पाहताना दिसत आहे. 


क्षितीजा घोसाळकर काय म्हणाली?


“Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर. आजपर्यंत, तुझी ‘माझं घर’ अशी असलेली ओळख आता ‘माझं माहेर’ अशी होणार..आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार…तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खास एक चेहराच मिळालाय! बघ ना, काही मनसोक्त हसतायत…काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय…तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल…त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार… सणावाराला येईन आवर्जून, तुझी भेट घ्यायला…तुही मग तयार राहा, आपलं नेहमीचं हितगुज करायला…PS- सासरी रमेपर्यंत आणि रमल्यानंतरही तुझी आठवण मात्र कायम येईल,” अशी पोस्ट क्षितीजाने केली आहे. 



तिच्या या पोस्टवर प्रथमेश परबनेही कमेंट केली आहे. "किती छान, तुला इकडे एवढं प्रेम देऊ की तुला दोन्ही घर आपली वाटतील, आय लव्ह यू", असे प्रथमेश परबने म्हटले आहे. त्यावर क्षितीजानेही "मला याची खात्री आहे. आय लव्ह यू टू", असे म्हटले आहे. 


दरम्यान प्रथमेश-क्षितीजा यांची पहिली ओळख इन्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितिजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आता त्या दोघांनी एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. ते दोघेही 24 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत.