COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला न रूजणारी गोष्ट व्यक्त केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टी स्पष्ट करतो. यामध्ये आता लता मंगेशकर यांनी देखील सहभाग घेतला आहे. लता मंगशेकर यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत. 


ही आहे लता दिदींची खंत 


हिंदी सिनेमाच्या सुवर्ण काळात गाजलेल्या कर्णमधुर गीतांची मोडतोड करून ती रिमिक्स म्हणून नव्यानं सादर करणे हे चुकीचे आहे, असं स्पष्ट प्रतिपादन लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमधून केलं आहे. असं केल्यानं मूळ गाण्याचं माधुर्य नष्ट तर होतेच शिवाय त्या गाण्याशी संबंधित गायक, गीतकार, संगीतकार आणि वादक यांच्यावर अन्याय होतो.



गाजलेल्या जुन्या जमान्यातली सिनेमाची गाणी नव्यानं सादर करणे यात काही वावगं नाही, असं नमूद करून लतादीदी पुढे म्हणतात की, नवेपणाच्या नावाखाली जुन्या गाण्याचे शब्द बदलणं, चुकीचे शब्द गाण्यात कोंबणे आणि चाल - वाद्यवृंद रचनेत मनमानी बदल करणे, असे प्रकार सध्या सर्रास सुरु आहेत. हे पाहून कोणत्याही सच्च्या मनाच्या कलावंताला मनस्ताप होतो.


सुवर्ण काळातल्या गीतांसाठी अनेक श्रेष्ठ आणि गुणी कलावंतांनी भरपूर मेहनत घेतली होती. प्रतिभेला चिकाटीची जोड देऊन या कलावंतांनी असंख्य उत्तम गाणी रचली. ही गाणी त्याकाळात लोकप्रिय झाली. परंतु ती आजही ती रसिकांच्या मनाला भुरळ पाडत आहेत.अशा गाण्यांचे अभद्र विकृतीकरण पाहून माझ्या मनाला वेदना होतात, असे लतादीदी पुढे म्हणतात.


लतादीदिनीं आपल्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये त्याकाळातल्या व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, मेहबूब खान, बिमल रॉय, के.आसिफ, गुरु दत्त, राज कपूर, शक्ती सामंता, राज खोसला, नासिर हुसेन, हृषीकेश मुखर्जी, गुलजार अशा दिग्गज दिगदर्शकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. त्याच प्रमाणे मास्टर गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, पंकज मलिक, अनिल विश्वास, सी. रामचंद्र, सज्जदजी, शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन नौशाद, मदन मोहन, रोशनलाल, सुधीर फडके, वसंत देसाई, जयदेव, खय्याम, आर डी बर्मन, सलील चौधरी ते लक्ष्मीकांत प्यारेलाल, जतीन-ललित अशा संगीतकारांच्या पाच पिढ्याचे ऋण मान्य केले आहेत.


तसेच अमीरबाई कर्नाटकी, जोहराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर, महंमद रफी, तलत मेहमूद, मुकेश, किशोर कुमार, हेमंत कुमार, मन्ना डे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुमन कल्याणपूर, येशूदास, एस.पी.बालसुब्रह्मण्यम अशा गायक- संगीतकारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी, शैलेंद्र, राजेंद्र कृष्ण, पं.प्रदीप, पं. नरेंद्रजी शर्मा, पं. इंद्र, भरत व्यास, कैफी आजमी, हसरत जयपुरी, इंदिवर, राजा मेहंदी अली खान, गुलजार, आनंद बक्षी, नीरज, जावेद अख्तर या गितकारांनी हिंदी सिनेमातील गाण्यांना आपल्या शब्दरचनेतून अमर केलं. यासंबंधी संगीत कंपन्यांनी आपली जबाबदारी समजून कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा लतादीदींनी व्यक्त केली आहे.